लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद गावाजवळ बिबटय़ाने हल्ला करून शनिवारी रात्री नऊ मेंढय़ांना ठार केल्याची घटना घडली. मेंढपाळांच्या पाळीव कुत्र्यांनाही बिबटय़ाने गंभीर जखमी केले आहे. तोरणमाळ वनक्षेत्राचे वनपाल व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.याबाबत सविस्तर वृत असे की, म्हसावद गावालगतच रामदास अजरुन कोळी यांच्या मिरचीच्या शेतात शनिवारी संध्याकाळी चार मेंढपाळ मेंढय़ा घेऊन चारणी करण्यास आले. त्यांचा मुक्काम याच शेतात होता. त्यांच्या वाडय़ावर रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबटय़ाने मेंढय़ांवर हल्ला चढवून नऊ मेंढय़ा ठार केल्या. त्यात चार मेंढय़ा मारून तेथेच राहू दिल्या तर चार मेंढय़ा शेताच्या बाजूलाच केळीच्या शेतात फरफटत नेल्या व दोन मेंढय़ा गंभीर जखमी आहेत. यात एकूण 65 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात खेमा डेमा पडलकर रा.खोक्राळे, ता.नंदुरबार यांच्या तीन, भगा पूना गोदकर रा.आसाणे, ता.नंदुरबार यांचा दोन मेंढय़ा ठार तर एक जखमी, हिमा बोदल करे रा.खोक्राळे, ता.नंदुरबार यांच्या चार मेंढय़ा ठार तर एक मेंढी जखमी झाली. रात्री आठ वाजेपासून ते दोन वाजेर्पयत बिबटय़ाचा थरार सुरुच होता. मेंढपाळांजवळ संरक्षणासाठी कुत्रे होते मात्र त्यांचाही टिकाव लागला नाही. कुत्र्यांनाही बिबटय़ाने गंभीर जखमी केले आहे. तोरणमाळ-राणीपूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुनील खुणे, वनपाल पी.आर. निळे यांनी पंचनामा केला. ए.जी. पावरा, के.के. पावरा, कांतीलाल वळवी, सुकलाल पावरा यांनी सहकार्य केले. तिन्ही मेंढपाळ कुटुंबातील लोकांनी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, वनक्षेत्रपाल सुनील खुणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर हल्ला हा बिबटय़ाचा नसून संदिाग्धता आहे. कारण कोठेही बिबटय़ांचे पगमार्क आढळून आले नाहीत. मेंढय़ांच्या पायाची हाडेही मोडलेली होती. शेतकरी, मेंढपाळ कोणाचीच भेट झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर शेतक:याची भेट घेतली असता सकाळी खाटीक आल्याने त्यांनी पाय मोडल्याचे सांगितले. प्रत्येक मेंढीच्या मानेजवळ चावा घेतल्याच्या मोठय़ा जखमा आढळून आल्याचे सांगितले.
बिबटय़ाच्या हल्ल्यात नऊ मेंढय़ा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 1:05 PM