बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मात्र नितीश कुमार हे कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा करून मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. पाटणामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी सांगितले की, नितीश कुमार हे आणच्यासोबत राहिलेले आहेत. ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. नितीश कुमार यांनी आधीही अशाप्रकारे मित्रपक्ष बदललेले आहेत.
बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांना नितीश कुमार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. नितीश कुमार यांनी पुन्हा एनडएमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना सोबत घेतले जाईल का, असं विचारलं असता आठवले म्हणाले की, नितीश कुमार हे आधीही आमच्यासोबत राहिलेले आहेत. तसेच ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. नितीश कुमार यांनी विरोधी आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीला जाऊ नये, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले.
रामदास आठवले हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंगेरचा दौराही केला. तसेच बिहारमध्ये झालेल्या विकासकामांबाबत नितीश कुमार यांचं कौतुकही केलं. त्यांनी सांगितलं की बिहारमध्ये रस्त्यांसह इतर क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केलेलं विकासकाम सहजपणे दृष्टीस पडतं. आधी बिहारमधील रस्ते चांगले नव्हते. मात्र आता नितीश कुमार यांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम झालं आहे.