नंदुरबार : एकीकडे समाज आधुनिक होत चालला, विविध जुन्या प्रथा, परंपरा मोडीत काढत चालला. शिवाय नोंदणी पद्धतीने विवाहाचाही आग्रही काहीजण करू लागले. असे असताना ग्रामीण भागात मात्र ‘हुंडा’ पद्धत काही कमी होत नसल्याची स्थिती आहे. अगदी उच्च शिक्षित आणि उच्च घराण्यातही ‘हुंडा’ लागतोच. एकीकडे युवक वर्ग त्याला विरोध करतोय, तर दुसरीकडे मुलाचे आई-वडील हुंड्याचा आग्रह धरतात असे चित्र समाजात आहे.
विविध समाजांमध्ये आजही हुंडा पद्धत अस्तित्वात आहे. किंबहुना हुंड्याची रक्कम वाढत चालली आहे. युवकांना उपवर युवकाला त्याच्याशी काही घेणे-देणे नसते. परंतु, त्याच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांना मोठा हुंडा मिळावा अशी अपेक्षा असते. माझा मुलगा एवढा शिकला, एवढी मोठी नोकरी मिळाली, एवढे मोठे घरदार आहे असे सांगून वधूकडील मंडळींकडून हुंडा घेतला जातो. एकीकडे हुंडाविरोधी चळवळ राबविली जाते. विविध समाजातील पुढारी या चळवळीविषयी मोठमोठी भाषणे देतात, समाज संमेलनांमध्ये ठराव करतात, दुसरीकडे त्यांच्याच घरात, त्यांच्याच नात्यात हुंडा घेतला जातो.
n हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शिक्षा - हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ च्या कलम ३ अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी पाच वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी रुपये १५,००० अथवा अशा हुंड्याच्या मूल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
n हुंडा मागण्याबद्दल शिक्षा- या कायद्याच्या कलम ४ अन्वये हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी सहा महिने परंतु दोन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची आणि रु. १०,००० पर्यंत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
आजकालच्या मुली मुलांइतक्याच शिक्षण घेऊन नोकरी करीत आहेत. मग हुंडा का द्यावा. हुंडा ही कालबाह्य पद्धत झाली आहे. मला नाही वाटत आजचा शिक्षित युवक हुंडा मागेल. केवळ त्याच्या आई-वडिलांचा आग्रह असतो. त्यामुळे तो द्यावा लागतो. जर कुणी हुंडा घेत असेल तर त्याचा समाजाने बहिष्कार केला पाहिजे.
-ऐश्वर्या पाटील, युवती, नंदुरबार.
मुलांच्या शिक्षणाच्या अनुरूप आणि तेवढ्याच पगाराची मुलगी वधू म्हणून मिळाली तर हुंडा का मागावा. बुरसटलेल्या विचारांना आता फाटा देणे आवश्यक आहे. पूर्वी मुलगी म्हणजे चूल-मूल ही संकल्पना होती. आता ती बदलली आहे. त्यामुळे मुलाच्या बरोबरीने मुलगीही समाजात वावरू लागली आहे.
- प्रतीक ठाकरे, युवक, नंदुरबार.
मुलाकडची मंडळी आता हुंडा हा शब्द वापरत नाही. त्या माध्यमातून विविध वस्तू घेत असतात. मुलीसाठी एवढे सोने, त्यांच्यासाठी शहरात फ्लॅट वगैरेची मागणी असते. त्यामुळे हुंडाची व्याख्या बदलली आहे. याबाबतही जनजागृती झाली पाहिजे. मुलगा, मुलगी एकमेकांना पसंत असतील तर इतर बाबींना फाटा देऊन त्यांचे शुभगंमल लावून द्यावे.
- उपवर मुलीचे पालक.
आमच्या समाजात हुंडा ही पद्धतच आता अस्तित्वात नाही. मुलाला मुलगी पसंत झाली, घरदार चांगलेे राहिले तर मुलीच्या घरच्या मंडळी त्यांच्या साजेशा पद्धतीने विवाह समारंभ पार पाडतात. इतर समाजानेही आता हुंड्याला फाटा द्यावा व आधुनिकतेची कास धरावी. तसे झाल्यास हुंडाबळींची संख्या समाजात राहणारच नाही. अनेक अबलांचे प्राण वाचतील.
-उपवर मुलाचे पालक.