लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचात गैरव्यवहार प्रकरणी चाैकशी समितीने दिलेल्या चाैकशी अहवालप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाने दोन सरपंच, दोन प्रशासक आणि तीन ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे. नोटीस बजावलेल्या पाचही जणांना १० दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीत २०१६ ते २०२० या काळात १४ व्या वित्त आयोगातील निधी वापरासह पाच टक्के पेसा निधीसह शासकीय निधी वापरात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चार सदस्यांची चाैकशी नियुक्त करुन ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चाैकशी पूर्ण करण्यात आली होती. या समितीने गेल्या महिन्यात ४० पानांचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता. या अहवालाचे जिल्हा परिषद प्रशासनाने अवलोकन केल्यानंतर यातील एक माजी व एक विद्यमान सरपंच, दोन प्रशासक व २०१६ ते २०२० या काळात काम करणा-या दोन तीन ग्रामसेवकांना नोटीसा बजावल्या आहेत. नाेटीसा प्राप्त झालेल्या सात जणांना १० दिवसात म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान सोमवारी ह्या नोटीसा संबधितांना देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे अद्याप त्यांचा नोटीस कालावधी सुरू असल्याची माहिती आहे. नोटीसा मिळाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले असून अक्कलकुवा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार कसा केला गेला हे अहवालात बंद आहे. नोटीसा मिळाल्यानंतर संबधित काय उत्तर देतात याकडे लक्ष लागून आहे.
नोटीसा मिळालेले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कोण याची चर्चा सध्या अक्कलकुव्यात आहे. दरम्यान अक्कलकुवा ग्रामपंचायतीबाबत प्रथमच अशा प्रकारची कारवाई केली आहे. यातून पुढे काय याकडे लक्ष लागून आहे.