गेल्या काही महिन्यांपासून कुख्यात आरोपी मोहम्मद अशरफ नागोरी हा नवापूर शहरात वास्तव्यास होता. अशी बातमी गुजराती माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाने नवापुरात वास्तव्यास असल्याचा काही संबंध नसल्याचा खुलासा केला. महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे गुजरात राज्यामध्ये संघटित गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात येते. नमूद आरोपी याच्याविरुद्ध लाल गेट पोलीस स्टेशन सुरत येथे संघटित गुन्हेगार अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. या आरोपीविरुद्ध शस्त्र बाळगणे, खंडणी वसूल करणे व अनेक गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. तेव्हापासून तो फरार होता. त्याचा तपास एटीएस सुरत हे करीत आहेत. त्यांना आरोपीचे लोकेशन पश्चिम बंगाल कोलकत्ता येथे मिळाले. त्या अनुषंगाने त्यांनी लोकेशन ट्रेस करून तो रेल्वेने कोलकाता येथून येत असताना नवापूर येथे रेल्वे स्टेशनवर सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. तो नवापूर येथे कुणाकडेही वास्तव्यास नव्हता किंवा नवापूर येथे अर्थाअर्थी त्याचा काहीही संबंध नाही. त्या १५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही माहिती एटीएस प्रमुख चेतन जाधव पोलीस निरीक्षक यांच्याकडून घेतली असून त्यांनी त्याला रविवारी ताब्यात घेतले आहे, अशी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.
या घटनेने नवापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवापूर शहर महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागात असल्याने अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीला अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे. यावर पोलिसांनी कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.