लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराच्या हद्दीतील विविध वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातील काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना जायबंदी केले आहे. आठवडाभरातत सहा जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यात एका बालिकेचा देखील बळी गेला आहे. दरम्यान, मोकाट कुत्र्यांचे निर्बजीकरण किंवा त्यांना पकडण्याची मोहिम पालिकेच्या ठेकेदाराने राबविलीच नसल्याचे चित्र आहे. आता बालिकेचा बळी गेल्यानंतर ही मोहिम राबविली जात असली तरी त्याला किती आणि कसे यश येते याकडे लक्ष लागून आहे. शहरात पावसाळ्यानंतर मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली आहे. गल्लोगल्ली आठ ते दहा कुत्र्यांची झुंड सहज नजरेस पडते. याबाबत पालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांचे निर्बजीकरण करणे याबाबतचा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी ठेकेदार देखील नेमला होता, परंतु त्याने कामच केले नसल्याची स्थिती आहे. रोगामुळे पिसाळलेमोकाट कुत्र्यांना गेल्या महिनाभरापासून अज्ञात रोगांची लागण झाली आहे. शरिरावरील कातडी गळून पडत असून होणाऱ्या जखमांमुळे कुत्रे पिसाळत आहेत. शिवाय त्यांना अन्नाचाही तुटवडा भासत असल्यामुळे ते सरळ नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावा घेत आहेत. याबाबत पालिकेने गांभिर्याने घेणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतला. मोहिम पुर्ण होतच नाहीकुत्रे पकडण्याची मोहिम दोन वर्षापूर्वी देखील राबविण्यात आली होती. परंतु कुत्रे मारतांना अनेकांनी व्हिडीओ तयार करून त्याबाबत ठेकेदारालाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला. प्राणी संरक्षण अधिनयमाचाही काहींनी आसरा घेतला. त्यामुळे ठेकेदाराला व पर्यायाने पालिकेला ती अर्ध्यातूनच बंद करावी लागली होती. कूत्रे पकडण्यासाठी ठेकेदाराकडे किंवा पालिकेकडे अत्याधुनिक साधनांची कमरता असल्यामुळे कर्मचारऱ्यांना जीव धोक्यात घालून कुत्रे पकडण्याची मोहिम राबवावी लागत असते. त्यासाठी कर्मचाीर तयार होत नसल्याने मोहिम बंद करावी लागते हा वेळोवेळीचा अनुभव आहे.उघड्यावर मांसचा परिणामउघड्यावर मांस टाकण्याचा प्रकारामुळे देखील काही भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील वळण रस्त्यावरील वाघेश्वरी टेकडी ते व्ही.जी.पेट्रोलपंप दरम्यान ठिकठिकाणी असे मांस, कोंबडीचे पिसे टाकलेले आढळतात. नाल्याच्या पुलाखाली तर हमखास आढळतात. अशीच स्थिती पीडब्ल्यूडी कार्यालय ते साक्री नाका दरम्यान आहे. मच्छी बाजारातील उरलेले मांस या भागात फेकले जाते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांची झुंडी पहावयास मिळतात. याशिवाय अनेक ठिकाणी उकिरडे असून त्यातील कचरा वेळोवेळी उचलला जात नसल्याने अशा ठिकाणी देखील कुत्र्यांची संख्या वाढण्यात मदत होत आहे. नवीन वसाहतींच्या भागात देखील कुत्र्यांच्या झुंडी पहावयास मिळतात.अपघातही वाढलेवाहनाच्या खाली येणे किंवा वाहनामागे मोकाट कुत्रे लागण्याच्या प्रकारामुळे अनेकांचा अपघात होऊन त्यांना जायबंदी व्हावे लागले आहे. रात्रीच्या वेळी असे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
अत्याधुनिक साधनांचा अभाव मोकाट कुत्रे पकडण्यासाठी संबधीत ठेकेदाराकडे अत्याधुनिक साधनांचा अभाव आहे. केवळ काठी, दोरीचा फास याच माध्यमातून त्यांना पकडण्यात येते. आधुनिक जाळी, पिंजरे लावले तर कुत्र्यांना पकडण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अशी साधने खरेदीसाठी पालिकेेने आर्थिक तरतूद करणे आवश्यक ठरणार आहे.
प्रशिक्षीत कर्मचारी हवे... मोकाट कुत्रे पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील नसल्याची स्थिती आहे. आपल्या परीने जमेल तशा पद्धतीने कर्मचारी कुत्रे पकडण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी त्यांच्या जिवावर देखील बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे या मोहिमेसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षीत करणे देखील गरजेचे ठरणार असून तसा प्रयत्न झाला पाहिजे.