रमाकांत पाटील, नंदुरबार : सेतू सुविधा केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या खात्यातून केंद्रचालकाने २ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना नोव्हेंबर २०२३ मध्ये घडली होती. याप्रकरणी वृद्धाने पाठपुरावा केल्यानंतर केंद्रचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भटेसिंग लोटन कोकणी रा. बालअमराई असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. भटेसिंग कोकणी हे ८ नोव्हेंबर २०२३ मध्ये पैसे काढण्यासाठी बालअमराई येथील एकनाथ लक्ष्मण कोकणी (३०) याच्या सेतू केंद्रात गेले होते. याठिकाणी त्यांच्या खात्यावरुन पैसे काढावयाचे होते.
दरम्यान केंद्रचालक एकनाथ याने उजवा अंगठा थंब स्कॅनरवर ठेवून घेत पैसे काढण्याची प्रक्रिया केली. परंतु नेटवर्क नसल्याने पैसे निघत नसल्याचे कारण दिले. परंतु भटेसिंग कोकणी यांच्या खात्यातून २ हजार रुपये वजा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यातून ६५ वर्षीय भटेसिंग कोकणी यांनी बँकेत पाठपुरावा करत पासबुक व इतर सर्व कागदपत्रे गोळा करुन २ हजार रुपये संबंधिताने काढून घेतल्याचे स्पष्ट करुन दिले होते. याप्रकरणी सोमवारी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भटेसिंग कोकणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित केंद्र चालक एकनाथ लक्ष्मण कोकणी (३०) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक मुकेश ठाकरे करत आहेत.