लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर हळू हळू बंदिस्त होत चालले आहे. शेफाली पार्क भागातील ४२ वर्षीय पुरूष व अवधुतवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष अशा दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्याची रूग्ण संख्या १७ वर पोहोचली आहे. मुसलमान मोहोल्ला येथील २९ वर्षीय महिला कोरोना संसर्गमुक्त झाल्याच्या सुखद बातमीने शहरास दिलासा मिळाला आहे.सोमवारी रात्री उशिरा शेफाली पार्क भागातील ४२ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त शहरात पसरले. प्रशासनाने तातडीने कारवाई हाती घेत औषध फवारणी, संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करणे, परिसर सील करणे या सारख्या कृती रात्री उशिरातून पूर्ण केल्या. मंगळवारी दुपारी पुन्हा अवधुतवाडी येथील ५८ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह झाल्याचे समजताच प्रशासनाची टीम तातडीने तेथे दाखल झाली. शीतल सोसायटीचा एक भाग आधीच सील असल्याने प्रशासनाला येथे संपर्कातील लोकांचे विलगीकरण वगळता नव्याने काही जास्त कृती करावी लागली नाही.तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन, पुरवठा अधिकारी मिलिंद निकम, पालिकेचे अधीक्षक मिलींद भामरे, कक्ष अधिकारी अनिल सोनार यांनी शेफाली पार्क व अवधुत वाडी भागात उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.नागरिकांना कंटेनमेंट झोनचे पालन करण्याची त्यांनी समज दिली. शहरासाठी मंगळवारी समाधान देणारी बातमीही मिळाली. मुसलमान मोहोल्ला येथील २९ वर्षीय महिला कोरोना संसर्गमुक्त झाली. व्यारा येथील उपचारानंतर महिला स्वगृही परतली.शहरात तीन दिवसात कोरोना रूग्णांची संख्या सात झाली आहे तर एकूण संख्या १० झाली आहे. एखाद्या रूग्णास कोरोना संसर्ग झाल्याबरोबर प्रशासनाला करावयाच्या उपाय योजनांमध्ये परिसर सील करणे व कंटेनमेंट झोन जाहीर करणे ही बाब सर्वप्रथम अंमलात येते. हे पाहता मंगलदास पार्क, जनता पार्क, मुसलमान मोहोल्ला, शेफाली पार्क, जुनी महादेव गल्ली, सरदार चौक, शीतल सोसायटी, अवधुत वाडी, राजीव नगर, इंदिरानगर, नारायणपूर रोड हा परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला. त्यात अलिकडे मंगलदास पार्क व जनता पार्क हा भाग वगळला गेला आहे. मात्र शहरात उर्वरीत भाग सील करून कंटेनमेंट झोनमध्ये बदलण्यात आला आहे. सील करण्यात येणाऱ्या भागाची व्याप्ती वाढत असून शहर हळूहळू बंदिस्त होत चालला आहे.कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करा, बाहेरगावी जाणे टाळा, सोशियल डिस्टन्सिंगचे पालन करून सॅनिटायझर व मास्कचा महत्तम वापर करून शासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे पालन करा, असे आवाहन तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.दरम्यान, बुधवारी नवापूर शहरात मात्र एकही रूग्ण न आढळल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
नवापुरातील रूग्णांची संख्या १७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:58 PM