कोरोना काळात विद्यार्थ्यांचे बॅंक खाते काढण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची फिरफिर होत होती. त्यात बॅंका सहकार्य करीत नव्हते. परिणामी विद्यार्थी, पालक व शिक्षक हैराण झाले होते. त्यामुळे थेट पालकांच्या खात्यावरच अनुदानाची रक्कम मिळावी अशी मागणी शिक्षक परिषदेने केली होती. परिषदेच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शालेय शिक्षण विभागाकडून १३ जुलै रोजी शिक्षण संचालकांना शालेय पोषण आहाराचे अनुदान पालकांच्या बँक खाती वर्ग करण्याची सूचना लेखी पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण संचालक प्राथमिक यांना संपर्क केला असता शिक्षण संचालक कार्यालयाकडून लवकरच पत्र निर्गमित करून राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांना शालेय पोषण आहार अनुदानासाठी पालकांची बँक खाती ग्राह्य धरली जाणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांनी समाधान व्यक्त केल्याचे शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले.
पोषण आहार अनुदान पालकांच्या खात्यावर जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:22 AM