लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान, रॅकेट बेंकैझर, प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील 100 गावात पोषण इंडिया कार्यक्रम राबविण्यात येत आहे. माता आणि बालकांच्या आरोग्य पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कुपोषण कमी करण्याच्या उद्देशाने व मातेचे उत्तम आरोग्य बाळगण्यासाठी 1 ते 30 सप्टेंबर्पयत पोषण माह जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामस्तरावर आयोजित करण्यात आला आहे. मातेचे पोषण आणि आहाराबद्दल सक्षमीकरण करून त्यांना स्तनपानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. पोषण माह मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानचे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक प्रेरकाची भूमिका बजावत आहेत. अंगणवाडी सेविका तसेच ए.एन.एम. या मोहिमेत मुख्य सहभाग घेऊन हा उपक्रम राबविणार आहेत. यामध्ये रॅलीचे आयोजन, पोषण माह पुस्तिका, पत्रकांचे वाचन व माता ज्ञान पुस्तिकाचे वाचन आदींचा समावेश असणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 100 गावात पोषण इंडिया मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:02 PM