कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटीलभाऊ माळी होते. याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य गोकुळ पवार, रणजित राजपूत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी आपल्या प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय पोषक अन्न वर्षाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोषक अन्नधान्याची माहिती दिली. पोषक अन्नधान्याच्या प्रक्रिया तसेच मूल्यवर्धनाद्वारे त्यांचा वापर आहारात करणे सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य गोकुळ पवार यांनी स्वस्थ आरोग्यासाठी संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सकस अन्नासाठी जमिनीचे सुपोषण गरजेचे असून विषमुक्त शेतीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात पाटीलभाऊ माळी यांनी, कोरोनाच्या काळात शरीराची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी संतुलित आहारात भाजीपाला तसेच ज्वारी, बाजरी, भगर, बर्टी, नागली यासारख्या पोषक अन्नाचा समावेश करावा, असे सांगितले.
सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले, तर आभार पद्माकर कुंदे यांनी मानले. कार्यक्रमास कोळदा आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थिनी, तसेच कृषी महाविद्यालयाचे ग्रामीण कार्यानुभवचे विद्यार्थी, शेतकरी उपस्थित होते.
- कार्यक्रमात शेतकऱ्यांना रोपांचे वितरण करण्यात आले.
- पोषण वाटिकेसाठी बियाणांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
- या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींना पोषक तृणधान्ययुक्त भोजन देण्यात आले.
- यावेळी पोषक अन्नधान्य प्रदर्शित करण्यात आले.
- कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
- पोषक अन्नधान्याच्या विविध प्रकारांचे पीक प्रात्यक्षिकांना भेट देण्यात आली.