लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव असा रेल्वेट्रॅक धरुन बिहार राज्यातील आपल्या गावी पायी जाणाऱ्या २२ जणांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांची रवानगी नंदुरबार शहरातील शेल्टर होमध्ये केली आहे़ हे २२ मजूर गुजरात राज्यातील पावगड येथून बिहारकडे जाण्यासाठी निघाले होते़लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने गुजरात राज्याच्या विविध भागात राहणारे परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहे़ यात बिहारी मजूरांनी नवीन शक्कल लढवत रात्रीच्यावेळी केवळ रेल्वेट्रॅकला धरुन प्रवास सुरु केला होता़ मजल दर मजल करत हे मजूर रविवारी रात्री रनाळे रेल्वेस्थानक परिसरात पोहोचले होते़ ही माहिती स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिली होती़ तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पोलीस पथकाला सोबत घेत रनाळे गाठून घेत पडताळणी केली असता, २२ जण दिसून आले़ हे सर्व २२ जण गुजरात राज्यातून निघाले होते़ रेल्वेट्रॅकमुळे कोणी विचारणा करणार नाही, अशी धारणा धरुन ते रात्रीच्यावेळी मार्गस्थ होत होते़ दर दिवशी किमान पाच किलोमीटर पायी चालून ते येथेवर आले असल्याची महिती आहे़ त्यांना तातडीने ताब्यात घेत प्रशासनाने शहरातील पालिका शाळा क्रमांक एकमध्ये तयार करण्यात आलेल्या शेल्टरहोमध्ये ठेवले आहे़ त्यांच्याकडून प्रशासनाने घरी जावू द्यावे अशी आर्जव सातत्याने करण्यात येत होती़विशेष बाब म्हणजे हे सर्व २२ लोक मजूरांच्या एका टोळीचे मुकादम असून त्यांच्या मागे गुजरात राज्यात आणखी किमान १५० जण असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे़ दाखल करण्यात आलेल्या २२ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे़ त्यांना सेवाभावी संस्थांच्या मदतीने जेवण देण्यात येणार आहे़
शाळा क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलेल्या मजूरांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाकडून त्यांचे येथेच काही काळसाठी पुनर्वसन करण्याचा विचार आहे़ यात त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार देऊन त्यांची व्यवस्था करण्याबाबत चर्चा सुरु आहे़ यासाठी मंगळवारपासून सुरु होणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात विचारणा करुन तशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार थोरात यांच्याकडून देण्यात आली आहे़