लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर पुनर्वसीत कुटूंबांना 1994-95 पासून घर, प्लॉट न दिल्याने प्रकल्पग्रस्त कुटूंबे नर्मदानगरातील ओपन प्लेस मध्ये राहत होते. शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून नर्मदानगरातील प्रकल्पग्रस्त 100 कुटूंबाने वाजतगाजत गट नंबर 466 ताब्यात घेवून ताबा घेतला. ढोल वाजवत शासनवालो सून लो आज हमारे गावमे हमारा राज, कोण म्हणतं देणार नाही-घेतल्याशिवाय राहणार नाही, हम हमारा हक जानते,नहीं किसींसे भीक मांगते.. अशा घोषणा देत गावातून रॅली काढत 100 प्रकल्पबाधित दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गट नंबर 466 वर पोचले. डनेल या मुळ गावातील सिंगा वेस्ता पाडवी यांना आजतागायत वेळोवेळी मागणी करूनही घरप्लॉट दिलेला नाही त्यांनी भूमिपूजन करत, नारळ फोडून जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे उदघाटन केले.जवळपास दोन तास दोन जेसीबीने सव्र्हे नंबर 466 चे सपाटीकरण करून तिथे प्रातिनिधिक स्वरूपात एक घरप्लॉटची मोजणी करून सिंगा वेस्ता पाडवी यांना गावातील सरपंच व ग्रामस्थांनी ताबा दिला.नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीत जवळपास 90 प्रकल्पबाधित 1994-95 पासून विना घरप्लॉट गावाच्या ओपनप्लेस मध्ये नाईलाजास्तव राहत आहेत. या सर्व प्रकल्पबाधितांना नर्मदानगर गावाठाणात स्थलांतर करून आणले आहे व घरप्लॉट मात्र कागदावर कागदी घोडे नाचवत सरदारनगर मध्ये दिले आहेत. या प्रकल्पबाधितांच्या शिफ्टिंग पासवर मूळ गावातून सोमावल गावाठाणात स्थलांतर करत असल्याचे नमूद असूनही घरप्लॉट सोमावल मध्ये दिलेले नाहीत. तसेच काही प्रकल्प बाधितांना दिलेल्या घरप्लॉट च्या ताबा पावतीवर असलेल्या नंबरचा घरप्लॉट प्रत्यक्षात नर्मदा विकास विभागाच्या नकाशावर अस्तित्वात नाही. आंदोलनाकरिता नर्मदा बचाओ आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, पुन्या वसावे, किर्ता वसावे, नूरजी वसावे, कालूसिंग पाडवी, किरसिंग वसावे व इतर नर्मदानगर चे प्रकल्पबाधित व ग्रामस्थ उपस्थित होते. नर्मदा विकास विभागाचे उप अभियंता अविनाश माळसे, आर.आर.पाटील, राठोड आदी उपस्थित होते. त्यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेतले व घरप्लॉट आम्हाला याच गावठाणात देण्यात यावे अशी लोकांनी त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर सदर प्रश्नासंदर्भात वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त कुटूंबांनी घेतला वाजतगाजत जमिनीचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:49 AM