तळोदा : तालुक्यातील कलावंतांचे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून अनुदान रखडल्यामुळे या कलावंतांपुढे मोठय़ा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संबंधित यंत्रणेने त्यांच्या बँक खाते क्रमांकाची चूक पुढे केली असली तरी यात तातडीने दुरुस्ती करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावून दरमहा पैसे द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.राज्यातील वृद्ध कलावंतांना कला व सांस्कृतिक विभागामार्फत मानधन दिले जात असते. दरमहा साधारण दीड हजार रुपये मानधन दिले जाते. तळोदा तालुक्यातदेखील अशा 105 वृद्ध कलावंतांना मानधन देण्यात येते. परंतु या कलावंतांचे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्काटली आहे. आर्थिक व्यवहारच ठप्प झाल्यामुळे उधार-उसनवारीची पतही संपली आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमरीची वेळ आल्याची व्यथाही त्यांनी बोलून दाखवली आहे. आपल्या रखडलेल्या मानधनाबाबत तपास करण्यासाठी हे कलावंत पंचायत समितीकडे सातत्याने चकरा मारत आहेत. तेथे संबंधित कर्मचारी भेटत नसल्यामुळे त्यांना निराश होवून घरी यावे लागत असल्याचे ते सांगतात. बहुसंख्य कलावंत हे खेडेगावातील असल्यामुळे चौकशीसाठी त्यांचा वेळ तर जातोच शिवाय आर्थिक झळदेखील सोसवी लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. नंदुरबार समाज कल्याण विभागाकडे रखडलेल्या अनुदानाबाबत विचारले असता आता कला व सांस्कृतिक विभागामार्फत थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जात असते. त्यामुळे बँकेमार्फतच त्यांना पैसे मिळतात. तळोद्यातील अनेक कलावंतांचे बँक खाते नंबर चुकीचे असल्यामुळे अशांचे मानधन रखडल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी याविषयी पंचायत समितीशी समनवय ठेवून लाभार्थीकडून त्यांचे बँक खाते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे. क्षुल्लक कारणासाठी तब्बल दहा महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडले असल्याने या कलावंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर तब्बल दोन वर्षापासून मानधन मिळाले नसल्याचा आरोप केला आहे.वास्तविक यातील काही अंध कलावंत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या मानधनावरच अवलंबून असतो. अशांची अतिशय बिकट अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून तातडीने त्यांचे रखडलेले अनुदान मिळवून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले : तळोदा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:52 PM