तळोद्यात पुन्हा दीड लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:51 PM
दुकान फोडले : चोरीच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये भीती
<p>तळोदा : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून दोन घरफोडय़ांपाठोपाठ दुस:या दिवशी रात्रीही चोरटय़ांनी दुकान फोडून सीसीटीव्ही कॅमेराचा रेकॉर्डीग बॉक्स, टीव्ही व एक लाख 33 हजार 620 रुपयांच्या रोकडवर चोरटय़ांनी डल्ला मारला. शहरात चोरटय़ांनी अक्षरश: धुमाकूळ घालून पोलिसांपुढे आव्हान उभे केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कॉलेज रोडवरील अन्नधान्याचे व्यापारी दीपक मनोहर कलाल यांचे स्वामी ट्रेडर्स नावाचे धान्य खरेदी व विक्रीचे दुकान आहे. त्यांना पहाटे स्थानिक व्यक्तीने मोबाईलवर दुकानात चोरी झाल्याचा निरोप दिला. दीपक कलाल व त्यांचे भाऊ प्रकाश कलाल हे सकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना दुकानाच्या मागील बाजूच्या दरवाज्याचा पत्रा वाकवून चोरटे दुकानात शिरल्याचे दिसून आले. त्यानंतर चोरटय़ांनी सीसीटीव्ही कॅमेराची वायर तोडून रेकॉर्डीग बॉक्स, टीव्ही व टेबलाच्या ड्राव्हरमधील एक लाख 33 हजार 620 रुपये रोख लंपास केल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेऊन पोलिसांना घटना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले. प्रकाश कलाल यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य जनतेत घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.