यावेळी सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते अनिल जावरे, मंडळ कृषी अधिकारी रमेश शिंदे, अविनाश खैरनार आदींनी सेंद्रिय शेतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी पांडुरंग पाडवी होते. सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे, सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते अनिल जावरे, मंडळ कृषी अधिकारी रमेश शिंदे, अविनाश खैरनार, नवनाथ साखरे व मशरूम शेतीचे मार्गदर्शक हेतलभाई चौधरी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन उघडेचा कुंभीखारीपाडा येथील सेंद्रिय शेतकरी धिरसिंग तडवी, आय.के. पाडवी, प्रतापसिंग पाडवी, मगन तडवी, गुलाब सिंह पाडवी, अमरसिंग तडवी, चांदया तडवी, सायसिंग तडवी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धिरसिंग तडवी यांनी केले, तर सूत्रसंचालन रामजी पाडवी यांनी केले.
या कार्यशाळेमध्ये सातपुड्यातील पारंपरिक अर्थात सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले धान्याचे प्रदर्शन करण्यात आले होते. या प्रदर्शनात सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेला काळा गहू, तसेच काळे तांदूळ व खपली गहू उपस्थित शेतकऱ्यांना अधिकच कुतूहलाचा विषय ठरला होता. सातपुडामध्ये सुरू झालेल्या मशरूमच्या शेतीतून उत्पादित झालेल्या मशरूमच्या शेती करण्यासाठीचे प्रात्यक्षिक जलसिंग वसावे यांनी करून दाखवले.
सातपुड्यात आजही पारंपरिक पद्धतीने अनेक पिकांचे उत्पादन घेतले जात असून येथील रानमेवा त्यासाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्यातील पारंपरिक अन्नधान्य तसेच फळांना योग्य बाजारपेठ मिळवून देऊन शेतकऱ्यांना आर्थिक नियोजनाबाबतीत आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प करण्यात आला.