लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : खेतिया गावाबाहेरील हनुमान मंदिराजवळील नाल्यात एक इसम वाहून गेला. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोचरा-गोगापूर रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाजवळ या इसमाचा मृतदेह आढळला.सततच्या पावसामुळे खेतिया गावाबाहेरील हनुमान मंदिराजवळ खेतिया-भातकी रस्त्यावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यादरम्यान ईश्वर अभिमन ठाकरे (45, रा.बेहडिया, ता.पानसेमल) हे त्यांच्या गावी बेहडिया येथे पायी जात असताना होते. पूल ओलाडतांना त्यांना काहीच सूचले नाही. पुलाच्या शेवटच्या टोकार्पयत पोहोचल्यानंतर पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांचा तोल सुटला व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पुलाच्या आजूबाजू उभ्या असलेल्या नागरिकांनी ठाकरे यांना पूल ओलांडून जाऊ नको, असे सांगितले. मात्र त्यांनी कोणाचेही न ऐकता पूल ओलंडायला सुरुवात केली. पाण्याचा प्रवाह एवढा वेगाने होता की त्यांना कोणीही वाचवू शकले नाही. बेहडिया गावातील ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. कोचरा-गोगापूर रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाजवळ ईश्वर ठाकरे यांचा मृतदेह आढळला. म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह सोमवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
खेतियात नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:31 PM