शहादा : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत नामनिर्देशनाची छाननी करण्यात आली़ दरम्यान जागा तेवढेच अर्ज प्राप्त झाल्याने पिंपळोद ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून चारपैकी दोेन ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत़तालुक्यातील जुनवणे, वरुळ तर्फे शहादा, पिंपळोद, बुपकरी व शिरुड दिगर या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता़ पाचही गावेही शहादा तालुक्यातील लक्ष्यवेधी गावे असल्याने निवडणूकांकडे लक्ष लागून होते़ दरम्यान शनिवारी लोकनियुक्त सरपंचांसाठी २० तर सदस्यपदाच्या ४१ जागांसाठी ६५ अर्ज प्राप्त झाले होते़ सोमवारी सकाळी अर्जांची छाननी करण्यात आल्यानंतर सदस्यपदाचे ३ अर्ज अवैध ठरवण्यात आले़ पिंपळोद ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागांसाठी सात आणि लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे़ उर्वरित चार ग्रामपंचायतीच्या २४ सदस्य आणि लोकनियक्त सरपंच पदासाठी २४ मार्च रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मनोज खैरनार यांनी दिलेली आहे़ दरम्यान जुनवणे, वरुळ तर्फे शहादा, बुपकरी आणि शिरुड येथे सदस्य आणि सरपंच बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ परंतू लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता लागू झाल्याने या चारही ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे महत्त्व वाढले आहे़जुनवणे येथे १ हजार ३४७, वरुळ तर्फे शहादा येथे १ हजार १००, शिरुड दिगर येथे २ हजार ५०३ तर बुपकरी ग्रामपंचायतीअंतर्गत ७७४ मतदार आहेत़ प्रभाग बिनविरोध झाल्यास यातील अनेकांची मतदानाची संधी हुकणार आहे़
शहादा तालुक्यात पाचपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:18 AM