लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगामाला गती आली असून अवघ्या महिनाभरात तीनही साखर कारखान्यांनी दोन लाख 17 हजार 308 टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून एक लाख 84 हजार 558 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.जिल्ह्यात यंदा मोठय़ा प्रमाणावर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने सर्वानाच त्याची चिंता लागून आहे. विशेषत: उसाचे उत्पादन घटेल, अशी ऊस उत्पादकांना व साखर कारखाना प्रशासनाला भीती आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा जिल्ह्यातील तीनही साखर कारखाने गेल्या हंगामाच्या तुलनेत लवकर सुरू झाले. सातपुडा साखर कारखाना 30 ऑक्टोबरला, आदिवासी कारखाना 2 नोव्हेंबर तर समशेरपूरचा कारखाना 4 नोव्हेंबरला सुरू झाला. त्यातच पहिल्या आठवडय़ातच शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने गाळपावर परिणाम झाला. त्यानंतर मात्र गाळप नियमित सुरू झाल्याने हंगामाला गती आली आहे. यावर्षी विशेषत: मराठवाडा व इतर भागात दुष्काळाची स्थिती असल्याने ऊस तोडणीसाठी तीनही कारखान्यांकडे मजूर मोठय़ा संख्येने आल्याने नियोजनाप्रमाणे कारखान्याचे ऊस गाळप सुरू झाले आहे.सातपुडा साखर कारखान्याने 3 डिसेंबर्पयत 82 हजार 270 टन उसाचे गाळप केले असून 8.52 च्या सरासरीने 70 हजार 75 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आदिवासी सहकारी साखर कारखान्याने 33 हजार 878 टन उसाचे गाळप केले असून 8.06 च्या सरासरीने 27 हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. समशेरपूर येथील कारखान्याने एक लाख एक हजार 160 टन उसाचे गाळप केले असून 8.62 च्या सरासरीने 87 हजार 183 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.एकूण जिल्ह्याची स्थिती पाहता तीनही कारखान्यांतर्फे दोन लाख 17 हजार 308 टन उसाचे गाळप झाले असून सरासरी 8.49 च्या उता:याने साखरेचे एक लाख 84 हजार 558 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. समशेरपूर येथील कारखान्याची गाळप क्षमता केवळ अडीच हजार मेट्रीक टन असली तरी या कारखान्यातर्फे रोज सरासरी चार हजार टन उसाचे गाळप होत आहे तर सातपुडा साखर कारखानाही चार हजार टन उसाचे गाळप करीत आहे. यावर्षी कारखान्यातर्फे मोठय़ा प्रमाणावर गाळप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तीन कारखान्यांकडून एक लाख 85 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:41 PM