n लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्याने गेल्या महिनाभरात एक लाख १४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, प्रतिदिन चार हजार १०० मेट्रिक टन गाळप सुरू आहे. कारखाना आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली.सातपुडा साखर कारखाना गेल्या ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेला आहे. शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या मेहनतीने चेअरमन दीपक पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुस्थितीत सुरू आहे. ऊसदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर अद्याप मोठा विश्वास असल्याची ही पावती आहे. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. उसाचे उत्पन्नही वाढले आहे. यावर्षी कारखाना पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करेल, असे ऊस नोंदीवरून दिसून येत आहे.कारखान्याने यावर्षी उसाला चांगला दर दिला आहे. प्रतिटन दोन हजार ३६५ रुपये असा दर दिला आहे. परिसरातील इतर कारखाने दोन हजार ३५० रुपये दर देत आहे. कारखान्यात ७०० कर्मचारी कार्यरत असून, साडेचार हजार ऊसतोड कामगार आहेत. ही संख्या नऊ हजारांपर्यंत जाते. ऊस वाहतुकीसाठी ४०० ट्रॅक्टरसह बैलगाड्या सुरू आहेत. कारखाना सुरू झाल्याने रोजगार मिळाला असून, परिसरात वर्दळ वाढली आहे. कोरोना महामारीमुळे सहा महिने कर्मचारी घरीच होते. आता मात्र कर्मचारी कामावर हजर झाले आहे. कोरोनाबाबत कारखाना कर्मचारी व शेतकऱ्यांची दक्षता घेत आहे.स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी १९७२ मध्ये सातपुडा साखर कारखान्याची मुहूर्तमेढ केली. तेव्हापासून साखर कारखाना अविरतपणे सुरू होता. केवळ २००१ ते २००५ या काळात कारखाना कमी पाऊस व दुष्काळामुळे बंद होता. २००५ पासून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाच्या अथक परिश्रमाने ऊस उत्पादकांचा असलेला विश्वास व पाठिंब्यामुळे कारखाना पूर्ववत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. यासाठी परिसरातील सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सांगितले.
महिनाभरात एक लाख टन ऊस गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 12:11 PM