लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या ४०० च्या पुढे गेली आहे़ यातून बाधितांची संख्या सोमवारी रात्री ४१२ झाली होती़ दरम्यान मंगळवारी आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने संख्या एकने वाढली असताना दुसरीकडे मंगळवारी १० जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़मंगळवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील ४६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ महिलेला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आले़ दरम्यान नंदुरबार शहरातील रघुवंशी नगर, कुंभार गल्ली, मोठा मारूती मंदिर परिसर, सरस्वती नगर, पायल नगर, बाहेरपुरा, चौधरी गल्ली आणि एस़पी आॅफिस पोलीस क्वार्टर्स येथील प्रत्येकी एक याप्रमाणे आठ तर शहादा शहरातील शंकर विहार आणि गरीब नवाज कॉलनी येथील प्रत्येकी एक असे दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत़ त्यांना कोविड कक्षातून सन्मानाने घरी सोडण्यात आले़शहरातील दोन्ही कोविड कक्षात रात्री आढळून आलेल्या ४५ रुग्णांमुळे १३७ जण उपचार घेत असून आजअखेरीस २४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत २ हजार ९५३ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यातील २ हजार ४६९ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत़ मंगळवारी ८३ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले होते़
एक अहवाल पॉझिटिव्ह तर दहा जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:10 PM