युवा नेते अभिजित पाटील यांचा १ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्त शहादा तालुका एज्युकेशनल अँड को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लिमिटेड संचलित सीनियर आर्ट्स महिला महाविद्यालय, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व आय.एम.आर.टी महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नंदुरबार जिल्ह्यातील विकास : गती आणि अवस्था, नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण : अभाव आणि आवश्यकता, नंदुरबार जिल्ह्यातील कृषी क्षेत्र : समस्या आणि उपाय’ या विषयांवर भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागासाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक तसेच प्रा. खेमराज पाटील यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्यास तीन हजार रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकास दोन हजार व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांकास एक हजार रुपये व स्मृतिचिन्ह, तसेच दोन स्पर्धकांसाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले आहे.
खुल्या गटासाठी स्पर्धा
स्पर्धा ही खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली असून, सहभागी स्पर्धकांनी आपला पाच मिनिटांच्या व्हिडिओ ७७९८६०२०२८ या व्हाॅट्सअप क्रमांकावर २८ सप्टेंबर सायंकाळपर्यंत पाठवावा. व्हिडिओ सोबत स्वतःचे नाव, पत्ता आणि विषयाचे नाव पाठवणे आवश्यक आहे. व्हिडिओ पाठवताना तो सलग असावा. एडिट केलेला, स्टॉप करून पुन्हा चालू केलेला नसावा. तसेच इको किंवा अन्य कोणत्याही साउंड इफेक्टचा वापर केलेला नसावा. व्हिडिओ आणि ऑडिओची कॉलिटी चांगली असावी. स्पर्धकाने आपल्या वक्तृत्वाचा व्हिडिओ मराठी, हिंदी आणि इंग्रजीपैकी एका भाषेतून पाठवावा. स्पर्धेत प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परीक्षकांचा निकाल अंतिम असेल व तो सर्व स्पर्धकांना बंधनकारक राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना १ ऑक्टोबरला अभिजित पाटलांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे.