बोरद : तळोदा तालुक्यातील कळमसर मोहिदा येथील मोहिदा शिवारातील उसाच्या शेतात बिबटय़ाचा मादी जातीचा बछडा सापडल्याने एकच खळबळ उडाली़ त्यामुळे परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभित झाले आहेत़ शनिवारी दुपारी मनोज पाटील यांच्या उसाच्या शेतात मशागत करीत असताना त्यांना बिबटय़ाचा बछडा दिसून आला़ सुरुवातीला बछडय़ाला बघताच मनोज पाटील व त्यांच्या सोबत असलेले सहकारी भयभित झालेत़ त्यांनी घटनेची माहिती वनखात्याला दिली़ त्यानुसार बोरद येथील वनपाल आनंद पाटील, वनक्षेत्रपाल नीलेश रोडे, वनरक्षक राजा पावरा, एफ़ओ़ नाईक, सुभाष खर्डे आदींनी घटनास्थळी हजेरी लावत घटनेची माहिती जाणून घेतली आह़े बिबटय़ाचा बछडा हा एक महिन्याचा असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आल़े खाण्याच्या शोधात माता बाहेर गेली असल्याने बछडय़ाला एका ठिकाणी ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आह़े घटनेची माहिती मिळताच मोठय़ा संख्येने ग्रामस्थ व वन कर्मचारी या ठिकाणी जमा झाले होत़े या आधीसुध्दा बोरद परिसरात बिबटय़ाचा बछडा आढळून आला होता़ त्यानंतर त्याचा दुधाअभावी मृत्यू झाला होता़
मोहिदा शिवारात बिबटय़ाचा बछडा सापडल्याने एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:46 PM