नंदुरबार - सरळ सेवा भरतीची पदे ही पेसा क्षेत्रात पेसा कायद्यान्वये भरती केली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात पेसा दाखला मिळविण्यासाठी युवकांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी तत्त्वावरील केवळ एएनएम व एमपीडब्ल्यू ही दोनच पदे पेसाअंतर्गत भरता येतील, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वच पदे ही पेसा अंतर्गत भरावी अशी मागणी खासदार डॉ. हीना गावित यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांकडे मागणी केली होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदभरतीकरिता पेसा कायदा लागू करण्यासंदर्भात खासदार डॉ. हीना गावित यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद स्थायी समिती सभेतदेखील याबाबत रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी याबाबत आरोग्य विभागातर्फे माहिती देण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक यांनी जिल्हा परिषदेला पत्र दिले असून, त्यात अभियानाअंतर्गत कंत्राटी स्वरूपाचे पदे भरताना केवळ दोनच पदे ही पेसा अंतर्गत भरावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात कंत्राटी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी अर्थात एमपीडब्ल्यू व कंत्राटी एएनएम या पदांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत एएनम व एमपीडब्ल्यू सरळ सेवेने भरता येत असतात असेही स्पष्ट केले आहे.
५० टक्के दाखले वितरितसरळ सेवेने भरती होणाऱ्या पदांसाठी नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयात पेसा दाखला मिळविण्यासाठी युवकांची गर्दी होत आहे. आतापर्यंत ५० टक्के दाखले वितरित केले गेले असल्याची माहिती आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आली.