नंदुरबार : घरकुल बांधकाम ठेकेदाराची घरकुलांना रंगकाम करण्याची जबाबदारी असतांना पालिकेने नव्याने निविदा काढून रंगकाम करणार आहे. या विषयाला विरोध करीत विरोधकांनी हा विषय रद्द करण्याची मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. दरम्यान, विषय पत्रिकेवरील दहा विषय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष परवेजखान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मदनमोहन नगर व तैय्यबीनगर या भागातील खुल्या जागांवर चेनलिंक फेन्सींग कामाचा एकुण साडेअकरा लाख रुपये खर्चाच्या विषयाला विरोधकांनी विरोध केला. आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी चैनलिंक फेन्सिंग च्या कामांना पालिका सत्ताधा:यांनी मंजुरी दिल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. बैठकांमध्ये मुख्याधिकारी वेळोवेळी विरोधी नगरसेवकांना चुकीची माहिती देत असल्याचाही आरोप विरोधी नगरसेवकांच्या गटनेत्यांनी केला. विषय पत्रिकेच्या अजेंड्यावरील दहा विषयांवर चर्चा करण्यात आली.विकासकाकडून नगरपालिका बेटरमेंट शुल्क आकारण्यात असते. त्या शुल्कातून पालिका रस्ते पथदिव्यांसह इतर सुविधा पुरविते. परंतु पालिका शासनाच्या निधी मधून ही चेनलिंक फेन्सींगची कामे करीत असल्याचा आरोप विरोधी गटनेते व नगरसेवक गौरव चौधरी यांनी केला. सभेच्या प्रारंभी धडगाव तालुक्यातील भूषण पॉईंट जवळ झालेल्या बोट दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.बैठकीत भोणे रस्त्यावरील आणि जिल्हा रुग्णालयासमोरील घरकुलांना रंगकाम करणे, संभाजीनगरमध्ये सार्वजनिक शौचालय बांधणे, वेणू गोपालनगरमध्ये रस्ता कामास मुदतवाढ मिळणे. विविध कामांसाठी वैशिष्टयेपुर्ण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी व शासनाकडून अनुदान मागणीचा प्रस्ताव मांडण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्रासाठी विविध वस्तू खरेदीला मान्यता देण्यात आली. पाईपलाईन लिकेज दुरूस्ती, पाणी पुरवठा विभागाकडील कामे करणे यासाठी अभिकर्ता नियुक्त करण्यास व खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय तिमाही खर्चासही मंजुरी देण्यात आली.बैठकीला सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक उपस्थित होते. व्यासपीठावर मुख्याधिकारी गणेश गिरी, कार्यालयीन अधीक्षक संजय माळी, तुकाराम मराठे उपस्थित होते.
घरकुल रंगकाम विषयाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 3:04 PM