तळोदा : पीओएस प्रणालीतील सावळागोंधळ थांबवावा. रेशन धान्यात कपात करण्याच्या शासनाच्या अन्यायकारक धोरणास तीव्र विरोध करून या महिन्याच्या धान्यासाठी चलन न भरण्याचा निर्णय जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी मंगळवारी तळोदा येथील बैठकीत घेतला. याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाची भेटदेखील घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या या पावित्र्यामुळे ऐन सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनापुढे रेशन वाटपाचा प्रश्न निर्माण होणार आहे. साहजिकच हा तिढा प्रशासन कसे हाताळते याकडे लक्ष लागून आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने या महिन्यापासून पीओएस यंत्रावरच रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना तशा आशयाच्या सूचना एका लेखी पत्रानुसार देण्यात आल्या असून आपोआपच धान्यातही कपात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक मंगळवारी येथील कनकेश्वर मंदिरात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन होते. व्यासपीठावर आमशा पाडवी, शानूबाई वळवी, देवीदास अल्हाटकर, जयसिंग माळी, सुरेश इंद्रजित, अरविंद कुवर, वांगीबाई पावरा, राजेंद्र गुरव आदी उपस्थित होते. या वेळी शासनाच्या गरीबांच्या रेशन धान्याबाबत अन्यायकारक धोरणामुळे त्यांना वंचित ठेवण्याचा डाव असून पीओएससारखी क्लिष्ट प्रणाली लागू केली आहे. आता तर थम्बशिवाय कार्डधारकांना स्वस्त धान्य न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे थम्ब मॅच न होणा:यांना धान्य मिळणार नाही. साहजिकच त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे. वास्तविक पीओएस प्रणाली लागू करताना त्यातील साधनसामग्री सुसज्ज करूनच लागू केली पाहिजे होती. मात्र त्यात सतत सावळागोंधळच सुरू आहे. एकीकडे शासन अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुणालाही धान्यापासून वंचित न ठेवण्याची सक्त ताकीद दुकानदारांना देते तर दुसरीकडे शासनच अशी अन्यायकारक धोरण लागू करून गरीबांना धान्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. जोपावेतो जिल्हा पुरवठा विभाग धान्याची कपात न करता 100 टक्के धान्य उपलब्ध करून देणार नाही तोपावेतो कोणत्याही दुकानदाराने प्रशासनाकडे चलन न भरता धान्याची उचल करू नये, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन, अरविंद कुवर, शानूबाई वळवी, सुरेश इंद्रजित, जयसिंग माळी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रावणगीर गोसावी यांनी तर सूत्रसंचालन ताराचंद साळवे यांनी केले. बैठकीला साक:या पाडवी, विजय कदम, वसंत पाडवी, यशवंत चौधरी, रमण चौधरी, पोपट माळी, दिलीप टवाळे, भालचंद्र राणे, शरफू तेली, सिंधूबाई पिंपळे, सुनील सूर्यवंशी, विनोद चौधरी यांच्यासह तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा व नंदुरबार तालुक्यातील रेशन दुकानदार महिला व पुरुष उपस्थित होते.
तळोदा येथील जिल्हा बैठकीत पीओस प्रणालीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:50 AM