नंदुरबार : युजीसी रेग्यूलेशन 2018 मधील अन्यायकारक तरतुदींना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना अर्थात एन.मुक्टोचा विरोध राहणार असल्याचे संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले.संघटनेचा मेळावा जीटीपी महाविद्यालयात रविवारी दुपारी झाला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे होते. विद्यापीठ निवडणुकांनंतर पहिलाच विजयी मेळावा घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस प्रा.सावखेडकर, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ.मनोहर पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, सहसचिव पी.बी. अहिरराव, डॉ.मोहन पावरा, विद्या परिषद सदस्य डॉ.टी.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी, जिल्हाध्यक्ष डॉ.सी.पी.सावंत, डॉ.सुनील कुवर उपस्थित होते. सरचिटणीस प्रा.सावखेडकर यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट होईल, असे सांगितले. तसेच ए.आयफक्टोतर्फे युजीसी रेग्युलेशन 2018 मधील अन्याय तरतुदींना विरोध असल्याची माहिती दिली. डॉ.संजय सोनवणे यांनी उमविच्या घाईगर्दीच्या निर्णय प्रक्रियेवर तसेच सरकारच्या शिक्षक विरोधी धोरणांवर टीका केली. यामुळे प्राध्यापकांचे विद्याथ्र्याचे बरेचसे प्रश्न प्रलंबित असल्याने महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या माध्यमातून 71 दिवसाच्या वेतनाचा प्रश्न रिक्त पद भरतीचा प्रश्न सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी, नवीन पेन्शन योजना रद्द करणे, कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न आदींसह 11 मागण्यांसाठी सप्टेंबर महिना हा आंदोलनास असेल असे जाहीर केले. त्यानुसार ऑगस्ट रोजी काळ्याफिती आंदोलन, 20 ते 31 ऑगस्ट सहसंचालक / जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 सप्टेंबर रोजी काळदिवस व अटक करून घेणे, 11 सप्टेंबर एक दिवसीय काम बंद आंदोलन, 25 सप्टेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन असे टप्पे त्यांनी विशद केले. प्रास्ताविक डॉ.सी.पी.सावंत यांनी केले. सूत्रसंचलन डॉ.सुनील कुवर तर आभार डॉ.बी.बी.मंगळे यांनी मानले.
युजीसीच्या अन्यायकारक तरतुदींना विरोध : प्राध्यापक संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:10 PM