मनोज शेलार । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी संदिग्धता आढळून आलेल्या 71 पैकी 31 शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले असले तरी उर्वरित 40 शिक्षकांचे काय? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. शिवाय परिचर भरतीचीही चौकशी उघड का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेने तडकाफडकी गुन्हे दाखल करून वाहवा मिळवली, परंतु नंतर प्रकरणात जी शिथीलता आणली गेली त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण उघडकीस येवून दोन महिने झाले आहे. चौकशी समितीने 71 जणांच्या कागदपत्र आणि नियुक्तीपत्राबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानुसार प्रथम टप्प्यात 31 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय तत्कालीन दोन शिक्षणाधिकारी आणि चार कर्मचा:यांचा देखील त्यात समावेश होता. उर्वरित 40 शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ते शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 31 जणांवर गुन्हे दाखल होऊन काहींना अटकही करण्यात आली. परंतु 40 जणांचे काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर असतांना पहिला गुन्हा दाखल करण्याचे धाडस जिल्हा परिषदेने केले. त्यामुळे राज्यभर कौतूकही झाले. परंतु 71 पैकी केवळ 31 जणांनाच का शिक्षा उर्वरित 40 जण नियमानुसार आणि कायदेशीर बाबींची पुर्तता करून रुजू झाले आहेत काय? तसे असेल तर चौकशी समितीने कुठल्या आधारे त्यांच्यावर शंका घेतली होती? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्याला कारण जिल्हा परिषदेने थांबविलेली चौकशी आणि कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने व त्यात यापूर्वीचे आणि विद्यमान काही वरिष्ठ अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता असल्यामुळे आणि जिल्हा परिषदेची नाहक बदनामी होत असल्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात आली आहे. आता एसआयटीकडेच बोट दाखविण्याचे काम सुरू असल्याची चर्चा देखील सुरू आहे.परिचर भरती चौकशीचे काय?परिचर भरती चौकशीचेही गौडबंगाल कायम आहे. राज्यभरात 32 परिचर अपंग युनिटअंतर्गत सामावून घेण्याच्या सुचना व यादी असतांना एकटय़ा नंदुरबार जिल्ह्यात 23 जणांना सामावून घेण्यात आलेले आहे. यातही मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशी अहवालात देखील तसे नमुद असल्याचे बोलले जात आहे. मात्र परिचर भरतीचा चौकशी अहवाल देखील गुलदस्त्यातच राहिला आहे. आता हा अहवाल एसआयटीकडे दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते. परिणामी या प्रकरणीही चालढकल कायम आहे.पोलिसांचा तपासपोलिसांचा तपास देखील संथ गतीने सुरू आहे. ज्या 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी कुणामार्फत लाईन लावली होती. कुणाला पैसे दिले होते. कुणी कागदपत्रे तयार करून दिली याबाबत सर्व माहिती दिलेली असतांना पोलीसही मुळ सूत्रधारांर्पयत पोहण्यासंदर्भात चालढकलपणा करीत असल्याचे चित्र आहे.
संशयीत 71 पैकी 40 शिक्षकांबाबत नंदुरबार जि.प.चे वर हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:12 PM