n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दुसरी लाट नसली तरी दिवाळीच्या कालावधीत गर्दीत सहभागी होणे, गावाला जाणे यासह शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे स्वॅब घेतल्याने चाचण्या वाढल्यामुळे बाधितांचा आकडा वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी सजग राहून कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ॲाक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याचा पुर्ण महिना या काळात कोरोना बाधीतांची संख्या कमालीची रोडावली होती. दीड महिन्यात केवळ ३००रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु आता कोरोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. दररोज किमान ३० ते ६० रुग्ण आढळून येत आहे. याला कारण वाढलेल्या चाचण्या आणि बाधितांच्या संपर्कातील लोकांची तपासणी हे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे. कारण काहीही असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही सजग राहून संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दुसरी लाट नाहीजिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरी लाट म्हणता येणार नाही असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु दक्षता घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि व्यवस्था प्रशासनाने करून ठेवली होती. परंतु सुदैवाने जिल्ह्यात किंवा राज्यात ही लाट आली नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. रुग्णांचे वाढते प्रमाणजिल्ह्यात दररोज ३० ते ६० कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. दिवाळीच्या काळात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन केले नाही. शिवाय दिवाळीनिमित्त बाहेर गावी जाण्याचे प्रमाण, पर्यटनस्थळी जाण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे रुग्ण संख्या वाढली असल्याचे बोलले जात आहे. शिवाय २३ नोव्हेंबरपासून लागलीच शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरु करतांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आश्रमशाळांसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मिळून जवळपास सहा हजारापेक्षा अधीक जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याने ही संख्या वाढल्याचा अंदाजही आहे. साखळी तोडण्यासाठी प्रयत्नकोरोना बाधीतांची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे अर्थात कॅान्टॅक्ट ट्रेसींगवर भर दिला जात आहे. अशा व्यक्तींचे स्वॅब संकलन केले जात असून त्यांना क्वाॉरंटाईनही करण्यात येत आहे. सद्या अनेकजण होम क्वॅारंटाईनला पसंती देत असल्यामुळे क्वॅारंटाईन सेंटर बंद पडली आहेत. केवळ कोरोना उपचार कक्ष सुरू आहेत. नियमांचे पालन करावेजिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे. सद्या लग्न समारंभ आणि सार्वजिनक कार्यक्रमांना परवाणगी देण्यात आली असल्यामुळे अशा ठिकाणी गर्दी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला असल्याचे दिसून येत आहे. लग्न किंवा सार्वजनिक समारभांमध्ये सहभागी होतांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, वारंवार सॅनिटाझरचा वापर करणे आदी नियम पाळणे आवश्यक आहे. याशिवाय अशा कार्यक्रमांमध्ये लहान मुले व वृद्धांना नेण्याचे टाळणे हिताचे ठरणार आहे.
लग्न समारंभ ठरताय धोक्याची ठिकाणे... n लग्न समारंभ सद्या कोरोनाचे हॅाटस्पॅाट ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जातांना आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे. आयोजकांनी देखील आवश्यक त्या उपाययोजना करूनच पाहुणे मंडळींना बोलवावे अशा सुचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. n स्वॅब संकलन सद्या नंदुरबार व शहादा येथे करण्यात येत आहे. शिक्षक व शिक्षकेतरांचे स्वॅब घेण्यासाठी तालुकास्तरावर सोय करण्यात आली होती. आता ती बंद असल्याचे सांगण्यात आले. स्वॅब तपासणीसाठी आरटीपीसीआर आणि रॅपीड ॲण्टीजण या दोन्ही प्रकारच्या चाचण्या सुरू आहेत.