नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद येथे १०० पेक्षा अधिक डुकरांचा मृत्यू झाल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडली होती. या डुकरांचा मृत्यू हा आफ्रिकन स्वाईन फ्ल्यू नामक आजाराने झाला असल्याचा अहवाल भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानतर्फे देण्यात आला आहे. संस्थानकडे मृत डुकरांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्याची तपासणी केल्यावर हा अहवाल प्राप्त झाला आहे.
भोपाळ प्रयोगशाळेकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार म्हसावद, ता. शहादा येथील डुकरांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. मयत डुकरांचे शवविच्छेदन करत त्यांचे नमुने गोळा केले होते. हे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या नमुन्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर डुकरांचा मृत्यू आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी हा अहवाल जिल्हास्तरावर प्राप्त झाल्यानंतर तातडीने डुकरांच्या ‘किलिंग’ची माेहीम म्हसावद, ता. शहादा येथे सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजेपासून सुरू झालेल्या मोहिमेत म्हसावद गाव व परिसरातील ९ किलोमीटर परिघातील १४ डुकरांची किलिंग करण्यात आली आहे.
दरम्यान, अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डाॅ. उमेश पाटील यांनी सांगितले की, म्हसावद येथील डुकरांना एएसएफ अर्थात आफ्रिकन स्वाईन फ्ल्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून या भागातील सर्व डुकरांचे किलिंग शासनाच्या आदेशाने सुरू झाले आहे. नंदुरबार येथील मृत डुकरांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.