लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गावातील रस्ता काँक्रीटीकरणाचे बील काढण्यासाठी ठेकेदाराकडून 30 हजार रुपयांची लाच घेणा:या ग्रामसेवकाच्या पंटरला शहाद्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. महेश विनायक पाटील असे ग्रामसेवकाचे नाव असून संदीप गोविंद मराठे सअे लाच घेणा:याचे नाव आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असलोद, ता.शहादा ग्रामपंचायतीअंतर्गत दलीत वस्तीतील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम ठेकेदाराने केले होते. त्याचे बील काढण्यासाठी ग्रामसेवक महेश विनायक पाटील यांनी त्यांच्याकडे 30 हजार 500 रुपयांची मागणी केली होती. एवढी रक्कम मिळाल्याशिवाय बिलाचा चेक दिला जाणार नाही म्हणून बजावले होते. अखेर तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून शुक्रवार, 30 रोजी दुपारी संदीप गोविंद मराठे, पानटपरी चालक, नितीन नगर, शहादा यांच्याकडे देण्याचे ठरले. दुपारी संदीप मराठे याने 30 हजाराची लाच स्विकारताच त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबत ग्रामसेवक महेश पाटील व लाचेची रक्कम घेणारा संदीप मराठे यांच्याविरूद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शिरिष जाधव व पथकाने ही कारवाई केली.
लाच घेतांना पंटर जेरबंद ग्रामसेवकासह पंटरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:48 PM