लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गुजरात व महाराष्ट्राच्या सरहद्दीवर असलेल्या कुकरमुंडा येथे खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या पाच दिवसापासून भजन, कीर्तन, सत्संगासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. मंगळवारी सकाळी सद्गुरू खंडोजी महाराजांच्या पालखी व रथ मिरवणुकीने महोत्सवाची सांगता करण्यात आली. तापी नदी किनारी असलेल्या कुकरमुंडा येथे प्रभुरामचंद्राचे उपासक जसवंत स्वामी व कृष्णभक्त सदगुरू खंडोजी महाराज या दोन महान संस्तांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. याठिकाणी खंडोजी महाराजांचे समाधी मंदिर व जसवंत स्वामींचे पुरातन मंदिर आहे. अश्विन शुद्ध त्रयोदशी ते अश्विन कृष्ण द्वितीया या पाच दिवस खंडोजी महाराज मंदिरात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून सद्गुरू खंडोजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस सुरूवात करण्यात येवून या पालखीचे व रथाची ठिकठिकाणी भाविकांनी पूजा केली. दरम्यान दुपारी 12 वाजता गाव प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मिरवणूक समाधी मंदिरात आली. या वेळी संस्थांचे पाचवे गादी पुरूष उद्धव महाराजांनी काल्याचे कीर्तन केले. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी भाविकांनी पुढील वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठय़ा उत्साहापूर्ण वातावरणात साजरा करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन उद्धव महाराजांनी केले.
कुकरमुंडा येथे पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:10 PM