याबाबत माहिती अशी की, १९ रोजी रांझणी गावातील विठ्ठल मंदिराच्या बाजूस वसलेल्या रांझणी प्लॉट भागातील ग्रामस्थाला वराह जोरजोरात ओरडत असल्याने त्यांनी घराच्या छतावर चढून एलईडी टॉर्चने लांबपर्यंत प्रकाशझोत टाकला असता, दोन बिबटांनी वराहाला सावज केल्याचे दिसून आले. तद्नंतर त्या भागातील ग्रामस्थांनी दोन घरांच्या छतावर चढून पुन्हा बॅटरीच्या प्रकाशझोतात पाहिले असता, दोन-तीन बछडेही एकामागून एक निघाल्याचे त्यांना दिसले. यावरून ग्रामस्थांना बिबट्याचा पूर्ण परिवारच परिसरात असल्याचे दिसल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. परिसरातील ग्रामस्थांनी जवळपास दोन-तास बिबट्यांना पाहिले. बॅटरीचा प्रकाश बिबट्यांवर टाकला की, ते त्या दिशेने चाल करीत होते. त्यामुळे तत्काळ बॅटरी बंद करावी लागत होती, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.
दरम्यान, गेल्या महिन्यात याच भागात बिबट्यांनी दोन शेळ्यांना मृत्युमुखी पाडले होते, तर दोन शेळ्या मिळून आल्या नव्हत्या. त्यावेळीही वन विभागाने तत्काळ पंचनामा करून जनजागृती केली होती. पण आता संबंधीत विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
रात्रीच्या अंधारामुळे कॅमेऱ्यात कैद होऊ शकले नाहीत
रात्रीचा अंधार तसेच काहीसे अंतर व टॉर्चच्या झोतात बिबटे पुढे सरकत असल्याने कॅमेऱ्यात कैद होऊ शकले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.