प्रतापपूर : परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालता असून, शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान प्रतापपूर शिवारात बिबट्याने एका शेळीला फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रतापपूर परिसरात ऊस तोड झाल्याने सर्वत्र मोकळे रान झाले आहे. बिबट्याने प्रतापपूर, रांझणी, नवागाव, राणीपूर शिवारात वेळोवेळी कुत्रे, शेळ्या फस्त केल्याच्या घटना घडत असतांना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता जीवननगर पुनर्वसन येथील हुनाऱ्या अजाऱ्या वसावे हा आपल्या शेळ्या चारत होता. प्रतापपूर शिवारातील इंद्रसिंग डोंगरसिंग गिरासे यांच्या सर्वेनंबर ५० मधील उसाच्या बांधावर बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. या वेळी शेळ्यांचा आवाज आल्याने हुनाºया वसावे व रामदास ढग्या पावरा यांनी आरडाओरड केली. याप्रसंगी बिबट्याने शेळी फस्त केल्यानंतर तेथून पळ काढला.याबाबत भारतसिंग गिरासे यांनी वनक्षेत्रपाल एन.जे. शेंडे यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत कळविले असता वनक्षेत्रपाल शेंडे, एन.पी. पाटील, एल.टी. पावरा, एम.एस. डोळस, श्रावण कुवर, शरद नाईक यांनी घटनेच्या ठिकाणी जावून बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले.या वेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या पुन्हा शिकार करण्यासाठी येईल असे सांगून रामदास पावरा व वसावे यांना इतरत्र स्थलांतर करण्यास सांगितले. मात्र या घटनेमुळे प्रतापपूर शिवारातील रखवालदारांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
प्रतापपूर परिसरात बिबट्याची दहशत, शेळी केली फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:31 AM