लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाप्पांचे स्वागत यंदा खड्डेयुक्त रस्त्यांवरून होणार असल्याची स्थिती नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर येथील आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. चारही पालिकांनी तातडीने रस्ते दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ठिकठिकाणच्या शांतता समितीच्या बैठकीत या मागणीवर जोर देण्यात आला आहे.यंदा दोन वेळा अतिवृष्टी झाल्याने आणि सलग 15 पावसाची संततधार राहिल्याने ठिकठिकाणचे रस्ते खड्डयात गेले आहेत. सर्वसामान्य वाहनधारक कमालीचे हैराण झाले आहेत. शहराबाहेरील तसेच ग्रामिण रस्त्यांची ही अवस्था असतांना शहरी भागातील रस्त्यांची देखील वाट लागली आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे. त्या त्या पालिकांनी तातडीने रस्ते दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे. नंदुरबार : मुख्य मिरवणूक मार्ग खड्डयांचा नंदुरबार शहरातील अनेक भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. गणेश विसजर्न मिरवणुकीचा मुख्य मार्ग असलेल्या रस्त्यावरच प्रचंड खड्डे पडले आहेत. मंगळबाजारातून मुख्य मिरवणुकांना सुरुवात होते. तेथून गणपती मंदीर, सोनारखुंट, टिळक रोड, जळका बाजार, शिवाजी रोड, धोशाह तकीयामार्गे सोनी विहिर असा मार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेषत: मंगळबाजार ते गणपती मंदीर रोड, सोनार खुंट, जळका बाजार, यार्दीचे राम मंदीर ते देसाई पेट्रोलपंप या दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मोठय़ा खड्डय़ांमध्ये परिसरातील नागरिकांनी विटांचे तुकडे आणि मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था करून घेतली आहे. परंतु तरीही खड्डय़ांची तीव्रता कमी होत नसल्याची स्थिती आहे. दोन दिवसांवर गणेशोत्सव येवून सुद्ध पालिकेने खड्डय़ांची डागडुजी केली नसल्याची स्थिती आहे.या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतरही भागातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पालिकेने तातडीने कामाला सुरुवात करावी अशी मागणी होत आहे. शहाद्यात स्थिती बिकटशहाद्याची स्थिती यापेक्षा बिकट आहे. शहरातील असा एकही रस्ता नाही त्यावर खड्डे नसतील. काही ठिकाणी तर रस्तेच नाहीत काही ठिकाणी अर्धवट काम करून ठेवण्यात आले आहे. यामुळे गणेशोत्सवात अशा रस्त्यांमुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे. मुख्य मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती सोय करण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. परंतु त्यासाठीची टेंडर प्रक्रिया झाली नसल्याचे समजते. त्यामुळे पाचव्या, सातव्या व शेवटच्या दिवसाच्या विसजर्न मिरवणुकांना मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. काही मंडळे स्थापनेच्या दिवशी देखील मिरवणुका काढतात त्यांनाही या खड्डयांचा सामना करावा लागणार आहे.नवापूर, तळोदानवापूर व तळोद्यात देखील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. या पालिकांनी देखील तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसत नसल्याची स्थिती आहे. एकुणच यंदा बाप्पांचे खड्डेयुक्त रस्त्यांवरूनच आगमन होणार असल्याचे आतार्पयतच्या स्थितीवरून स्पष्ट आहे. दरम्यान, शांतता समितीच्या ठिकठिकाणी झालेल्या बैठकीत गणेश मंडळ कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर दरवर्षी पालिकांकडून खड्डे बुजविण्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. यंदा देखील तिच स्थिती राहणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. सध्या पाऊस बंद असल्यामुळे दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. वेळेवर खड्डे न भरले गेल्यास व रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास गणेशभक्तांच्या नाराजीला त्या त्या पालिका प्रशासनांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.