मोलगी : नैसर्गिकरीत्या काबाडकष्ट पदरी पडलेल्या आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजनेचे वेध लागले होते. या योजनेला प्रत्यक्ष चालना मिळाली असून, बहुतांश गरजू आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू लागला. त्यात धडगाव तालुक्यातील तेलखेडी, कात्रा, शिंदवाणी येथेही खावटी अनुदान योजनेंतर्गत धान्यवाटप करण्यात आले. यातून गरिबांना आपल्या काही समस्या सोडविण्यास हातभार लागला आहे.
आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या प्रयत्नातून कोरोना महामारीला तोंड देताना आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी दुर्गम भागात वसलेल्या गरीब आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू कीट स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्याचा उपक्रम ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. त्यात तेलखेडी येथे खावटी अनुदान योजनेचे वाटप नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, राजबर्डी गटाचे जिल्हा परिषद सदस्य जान्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान तेलखेडी येथील ७२२ आदिवासी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळाला. यापाठोपाठ कात्रा व शिंदवाणी येथील लाभार्थ्यांनाही धान्यवाटप करण्यात आले.
या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती मोयश्या गुरुजी व युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम पावरा यांनी खावटी अनुदान योजनेचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमात राजबर्डीचे जिल्हा परिषद सदस्य जान्या पाडवी, सरपंच मनीषा पाडवी, सदस्या वपारीबाई पाडवी, सदस्य दीपक पावरा, सामाजिक कार्यकर्ते दारासिंग पाडवी, सुकदेव पावरा, तेलखेडीचे पोलीस पाटील माका पावरा, मुख्यध्यापक वसावे, शिक्षक आर.एम. पावरा यांच्यासह तेलखेडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
खरं तर आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी हे स्वतः आदिवासी समाजाचेच एक घटक असल्याने त्यांना समाजाच्या व्यथा व कष्टाची चांगली जाणीव आहे. त्यानुसार आखण्यात आलेल्या आदिवासी विकासाच्या योजनांमध्ये खावटी अनुदान योजनेचाही समावेश केला. ही योजना आदिवासी विकासवाटेतील दीपस्तंभ ठरणार आहे. - जान्या पाडवी, जिल्हा परिषद सदस्य, राजबर्डी, ता. धडगाव
दुर्गम भागातील बहुतांश नागरिकांना कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी अपेक्षित माहिती नव्हती, अशा परिस्थितीत संपूर्ण कागदपत्रांची जुळवाजुळव करीत खावटीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. - दारासिंग पाडवी, रंदुलपाडा, ता. धडगाव