लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्ष आदेशानुसार जिल्हा परिषद निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगून विधानसभा निवडणुकीनंतर आता पक्षाने पुन्हा उभारी घेतली आहे. कुणाचीही तमा न बाळगता पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी असे आवाहन देखील पक्ष निरिक्षक नाना महाले यांनी केले.विधासनभा निवडणुकीनंतर राष्टÑवादी काँग्रेसचा पहिलाच जिल्हास्तरीय मेळावा नंदुरबारात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी आणि काही इच्छुकांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. पक्ष निरिक्षक नाना महाले यांच्यासह माजी आमदार शरद गावीत, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांच्यासह पदाधिकारी व इच्छूक उमेदवार उपस्थित होते. नाना महाले यांनी सांगितले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख जो निर्णय देतील त्याप्रमाणे लढविली जाईल. आघाडी करायची किंवा स्वतंत्र लढायचे याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. असे असले तरी जास्तीत जास्त जागांवर पक्षातर्फे उमेदवार दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.पक्ष तळागाळापर्यंत पोहचलेला आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व कुणीही संपवू शकत नाही. जि.प.निवडणुकीत पक्षाची ताकद दिसलेच असेही त्यांनी सांगितले.माजी आमदार शरद गावीत यांनी प्रास्ताविकात निवडणुकीची माहिती दिली. काही कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी काही इच्छुकांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या. लवकरच यादी जाहीर केली जाणार असल्याचे महाले यांनी सांगितले. बैठकीला माजी पदाधिकारी अनिल भामरे, सागर तांबोळी, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष आदेशानुसार निवडणुका लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:58 AM