नवापूर तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर हे दोन्ही अधिकारी नव्याने हजर झाल्यानेदेखील नवापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रकिया यशस्वीपणे राबविली. याप्रसंगी ११० वर्षाच्या आजीबाईने केले मतदान. नवापूर तालुक्यातील नांदवण ग्रामपंचायत अंतर्गत मतदान क्रमांक दोन याठिकाणी ११० वर्षाच्या आजीबाई वेलूबाई बाबू गावीत यांनी मतदानाचा हक्क बजावला. वयोवृद्ध असल्याने मतदान केंद्रात चालणे अवघड जात असल्याने नातेवाइकांनी त्यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आणले.
नवापुरातील मोठ्या ग्रामपंचायतीवर विशेष लक्ष
नवापूर तालुक्यातील धनराट, उमराण, वडकळंबी, ढोंग, पळसून या मोठ्या ग्रामपंचायतीवर प्रशासनाचे विशेष लक्ष होते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संध्याकाळपर्यंत या ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी दिसून आली.
नवापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायती अंतर्गत एकूण मतदारांची संख्या १८ हजार ५४३ एवढी होती. यात पुरुष आठ हजार ९५२ तर स्रिया नऊ हजार ५९१ होत्या.
नवापूर तालुक्यात पुरुष मतदारापेक्षा महिला मतदारांची संख्या सर्वाधिक होती. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. साडेसात ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान सकाळी बाराही मतदान केंद्रांवर १९.२१ टक्के मतदान झाले. ९.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान ४८.७६ टक्के मतदान झाले. ११.३० ते १.३० दरम्यान ६८.८९ टक्के मतदान झाले, तर शेवटच्या टप्प्यात ३.३० ते ५.३० वाजेपर्यंत पूर्ण मतदान झाले.