ऑनलाईन लोकमत
शहादा,दि.11 - देशाचे संविधान बलवान असून ते बदलण्याचे सामथ्र्य कोणातही नाही. जो कुणी संविधान व देश तोडण्याची भाषा करेल त्याला जनताच धडा शिकवेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे केले.
शहादा येथे तहसील कार्यालय परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण झाल़े अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.एम़ कलशेट्टी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य जयपालसिंह रावल, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, तहसीलदार मनोज खैरनार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, राजेंद्र गावीत, बापू जगदेव, रमेश मकासरे, काकासाहेब खंबाळकर, डॉ.कांतीलाल टाटिया, शिवसेनचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे दलितांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते होते. आज त्यांनी दाखविलेल्या मार्गाची व विचारांची खरी गरज आहे. प्रत्येक निवडणुकीत जय पराजय होत असतो. मात्र त्यानंतर सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन परिसराचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर निश्चितच विकास होतो. समाजात आज परिवर्तन होत आहे. काही ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले ते थांबविण्याची गरज आहे. आज देशात शांतता नांदावी यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे.
आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुतळा परिसरात सुशोभिकरणासाठी आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी जाहीर केले. प्रास्ताविक रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर यांनी केले. आभार अनिल कुंवर यांनी मानले.