नंदुरबार, दि.2 - महामार्गावरील 70 दारू दुकाने व परमीटरुम सील करण्यात दुस:या दिवशीही राज्य उत्पादन शुल्क विभागाला अपयश आले. अनेक परमीटरूम बाहेरून बंद तर आतून सुरू होते. नंदुरबारातील आठ पैकी दोन परमीटरूम पुर्णपणे बंद होते तर इतर आतून सुरू होते. अशीच स्थिती नवापूरसह परिसरात देखील होती.
महामार्गावरील पाचशे मिटरच्या आतील दारू दुकाने, परमीटरूम, बियर शॉपी बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र झाली असतांना नंदुरबारचे राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेतच होते. शनिवार, 1 एप्रिल रोजी नोटीसा दिलेल्या सर्वच 70 बार, परमीटरूम व दुकाने मात्र सुरू होती. रविवार, 2 एप्रिल रोजी देखील उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून ती सुरू होती. नावाला बाहेरून गेट बंद होते परंतु आतून विक्री सुरु असल्याचे चित्र होते. नंदुरबारसह परिसरात आठ पैकी सहा ठिकाणी हे चित्र होते. तर नवापुरात देखील यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. याबाबत कारवाईचे अधिकार केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागलाच असल्यामुळे पोलिसांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे.