आधुनिक तंत्रज्ञानाचे दृश्य फायदे आणि शेतमजुरांची कमतरता यामुळे शेती मशागत व पेरणी यातून सर्जा-राजाचे महत्त्व हळूहळू कमी होत चालल्याची खूण म्हणजे गेल्या काही वर्षात सुरू झालेली ट्रॅक्टरद्वारे होणारी शेती मशागत व पेरणी आहे. पोळा सणात मिरवणाऱ्या बैलांची संख्या कमी होत चालली आहे. ट्रॅक्टरच्या आगमनाने नांगरणी, कोळपणी, पेरणी व शेती साहित्य वाहून नेण्यासाठीची बैलगाडीची कामे कमी होत गेली. पूर्वी पेरणीला मात्र बैलजोडीची आवश्यकता होती. पेरणीच्या पांभरीला असलेल्या छिद्रातून मुठीने नियंत्रित पद्धतीने सोडलेले दाणे बांबूच्या पाइपातून विशिष्ट अंतरावर मातीत पडले की त्या मागून येणारे लाकडी/लोखंडी दाते बियावर माती पसरत पुढे जात. मुठीतून सुटलेले बियाणे कमी जास्त झाल्याने अनेकदा दाट व विरळ पिकाचे चित्र निर्माण होई. समान पेरणीसाठी पेरणीचे कौशल्य असलेल्या लोकांना मागणी असे. पांभरीची पूजा करून पेरणी सुरू केली जायची. दरम्यान, बैलजोडीचा मेंटेनन्स व शेती कामासाठी लागणारा वेळ यापेक्षा भाड्याचे ट्रॅक्टर परवडू लागले. त्याने पैसे जातात; परंतु अल्पावधीत काम निपटले जाते. म्हणून गेल्या काही वर्षात ट्रॅक्टरची विक्री वाढली आहे.
ट्रॅक्टरचे युग सुरू झाले आणि बैलांच्या वाटेची कामे कमी होत गेली. पेरणीच्या कामात कौशल्य असल्याने पेरणीतली मानवी अचूकता मिळविण्यासाठी आधुनिक तंत्र उपलब्ध व्हायला वेळ जावा लागला. पहिल्या टप्प्यात ट्रॅक्टरमागे बसून दोन जण बियाणे विशिष्ट रचना केलेल्या भागातून सोडत असत. त्यात सतत बसणाऱ्या हेलकाव्यामुळे तोल सांभाळून बियाणे खाली सोडावे लागत असे. आता सुधारित आवृत्ती बाजारात आल्याने बियाणे पेटीत भरले की कोणाचीच गरज भासत नाही. दोन्ही पद्धतीत बियाणे व खतेसुद्धा टाकता येतात.