नंदुरबार : बाजार समितीत आवक घटल्याने किरकोळ बाजारात भाजीपाला दर वाढले आहेत. मोजक्या भाज्या सध्या तरी महागल्या असून त्यात दराअभावी पडून असलेला भोपळाही पितृ पक्षात जोरदारपणे विक्री होण्यास सुरुवात झाली आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री व शिंदखेडा तालुक्यातून भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. यातून नंदुरबार शहर आणि लगतच्या ग्रामीण हद्दीतील नागरिकांची गरज भागवली जाते. कमीअधिक प्रमाणात आवक होत असल्याने दरांमध्ये दर दिवशी तफावत निर्माण होते. परंतु गेल्या काही दिवसात भाजीपाला आवक कमी झाली आहे. शेतशिवारात पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने शेतकरी सडका भाजीपाला फेकून देत असल्याचे चित्र आहे. यामुळे हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या अशा दोघांचीही आवक कमी झाली आहे. परिणामी पितृ पक्षात भाजीपाला महागण्यास सुुरुवात झाली आहे. बहुतांश नागरिकांकडे या काळात उपवास आणि श्राद्ध विधीचे कार्यक्रम होतात. यावेळी साधा आहार घेणे पसंत केले जाते. यात भोपळा व इतर भाज्यांचा समावेश आवर्जून केला जातो. यातून या भाज्यांची मागणी वाढत असल्याचे सांगण्यात येते.
बाजार समितीत सध्या भोपळा आवक झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठोक भावात ५ ते १० रूपये किलो या दराने मिळणारा भोपळा किरकोळ बाजारात येईपर्यंत ४० रूपये किलो तर नागरिकांपर्यंत ५० ते ६० रूपये प्रतिकिलो दरात पोहोचत आहे. बाजारात जाणे होत नसल्याने गृहिणी दारावर आलेल्या विक्रेत्याकडून भाज्या खरेदी करत आहेत. हा भाजीपाला महाग असला तरी बाजारात जाण्यासाठी पेट्रोलचा वाढीव खर्च करण्यापेक्षा घरासमोर आलेला भाजीपाला खरेदी करणे योग्य असल्याचे मत यावेळी गृहिणींनी मांडले.
शहरात दैनंदिन भाजीपाल्याची मागणी वाढीवच राहिली आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात त्यात वाढ होते.
सणासुदीचे दिवस असल्याने मासांहार वर्ज्य करत बहुतांश जण हिरवा भाजीपाला खाण्यास पसंती देतात.
प्रामुख्याने मेथी, भोपळा, पालक, तांदळा या भाज्यांना गृहिणींकडून या काळात पसंती दिली जाते.
शेतकरी आणत असलेला भाजीपाला खरेदी करुन तो योग्य प्रकारे स्वच्छ करणे, मार्केट फी, मजुरांची मजुरी, आडत यामुळे भाजीपाला दर वाढतात. किरकोळ विक्रेत्यांनाही वाहतूक खर्च येतोच. आणि भाजीपाला हा नाशवंत आहे. त्याचा सांभाळ करणे खर्चिक आहे.
-जितेंद्र माळी, व्यापारी,
बाजारातून खरेदी केलेला भाजीपाला दीर्घकाळ टिकवण्यासाठी कोणतीही सोय नाही. यामुळे तो खरेदी केल्यानंतर बाजारात विक्रीसाठी लागलीच ठेवावा लागतो. ग्राहकांना तो पसंत न पडल्यास मग सायंकाळपर्यंत त्याचे दर कमी करून विक्री करावी लागते.
-जगन माळी, विक्रेते.
बाजारात भाजी घ्यायला जाणेच महाग झाले आहे. पेट्रोलचा खर्च वाढतो. दुसरीकडे रिक्षाने गेल्याने भाडेवाढ झाली आहे. त्यातही स्वस्त भाजीपाला मिळेल याची खात्री नाही. यामुळे आम्ही घराजवळ येणाऱ्या विक्रेत्याकडून भाजीपाला खरेदी करतो.
-सुरेखा पाटील, नंदुरबार,
घराजवळही ताजा भाजीपाला विक्रीसाठी येतो. बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा घराजवळ आलेला विक्रेता त्याच दरात भाजीपाला देतो. काही भाज्या महाग असल्या तरी पालेभाज्यांचे दर बाजार भावानुसार असतात. यात मुलांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत.
-अश्विनी पानपाटील, नंदुरबार