नंदुरबार : अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून ५६ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील विमल हाऊसिंग सोसायटी परिसरात अवैध गॅस रिफलिंग सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. एका पिठाच्या गिरणीच्या बाजूला नयन अनिल मराठे हा रिफलिंग करीत असल्याचे आढळून आला. तेथे ३० हजार रुपये किमतीचे पॉवर पंप, आठ हजारांचा वजन काटा, १८ हजार ५०० रुपये किमतीचे गॅस सिलिंडर व इतर साहित्य असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक अभय राजपूत यांनी फिर्याद दिल्याने नयन अनिल मराठे (२३) रा. विमल हाऊसिंग सोसायटी, नंदुरबार याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जगदीश पवार करीत आहे.