नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील पेचरीदेव परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने रविवारी धाड टाकली. या धाडीत १३ जण जुगार खेळताना आढळून आले. पोलीसांनी कारवाईत १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पेचरीदेव परिसरात जयवंत पाडवी याच्या पत्र्याच्या शेडलगत मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांना मिळाली होती. यानुसार, त्यांनी पथकाने पेचरीदेव भागात शनिवारी रात्री सापळा रचला होता. यातून याठिकाणी जुगार सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने धाड टाकली, यावेळी जुगारींमध्ये एकच धावपळ उडाली. पथकाने या ठिकाणाहून ६१ हजार रुपयांचे मोबाइल, १८ हजार रुपये रोख, २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली, १० रुपये किमतीच्या दोन चारचाकी असा एकूण १३ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या १३ जण जुगार खेळताना आढळून आले. यात एका महिलेचाही समावेश आहे.
या प्रकरणी विशेष पथकाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाडवी यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित जयवंत राध्या पाडवी (२४) रा.उदेपूर, ता.अक्कलकुवा, सलमान मुसा दावजी (६३) रा.सिदांत फलिया, गुजरात, संतोषभाई सामाभाई वसावा (४०) रा.सेलंबा, गुजरात, राजेश कुंजीलाल कुशवाह (३८) रा.वराछा रोड, सुरत, विनय उर्फ विशाल धरमसिंह रबारी (२८) रा.कठोर, गुजरात, जयराम उर्फ जयेश वरबाभाई रबारी (४९) रा.अमरोली गुजरात, रफिकभाई देबाभाई अरब (४०) रा.सेलंबा, विशाल प्रकाशभाई अध्यारू (३१) रा.विशावगा, गुजरात, सलीम अकबर राठोड (३६) रा.अरबटेकड, गुजरात, आमील ईसाक मन्सुरी (५०) रा.सेलंबा, प्रतिबेन चंदूलाल ठुमर (३९) रा.कडोदरा, गुजरात, संजय तडवी (४०), रा.कोराई ता.अक्कलकुवा यांच्यासह आणखी एकाच्या विरोधात जुगार खेळण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन करत आहेत.