लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या बाजार समितींची निवडणूक जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे नवीन नियमानुसार या निवडणुका होणार असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार आहे. निवडणुकीत शेतक:यांना अर्थात शेतकरी मतदारांना सर्वाधिक महत्त्व राहणार आहे. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात तीन नगरपालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेक राजकीय समिकरणे देखील त्यातून निर्माण झाली होती. त्यामुळे आगामी राजकारणाची झलक काय राहील हे देखील त्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणा:या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु त्याची सेमीफायनल ही बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. नवीन कायदा व नियमानुसार शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या चार बाजार समितींच्या निवडणूक रंगणार आहेत. शेतकरी किंगमेकर..नवीन नियम व कायद्यानुसार बाजार समिती निवडणुकीत किमान दहा गुंठे जमीन असलेला शेतकरी हा मतदार राहणार आहे. त्यामुळे शेतक:यांना सर्वाधिक महत्त्व या निवडणुकीत असेल. पूर्वी ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थाचे संचालक हे मतदान करीत होते. आता त्यांच्या ऐवजी थेट किमान दहा गुंठे जमिन असलेला व किमान वर्षातून दोन वेळा बाजार समितीत शेतमाल विक्री करणारा शेतकरी मतदार राहणार आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र तालुका असल्यामुळे त्या त्या तालुक्यांचे शेतकरी मतदानासाठी पात्र ठरणार आहे. याशिवाय त्या त्या गटातून निवडून द्यावयाचे संचालक हे राहतीलच. अर्थात व्यापारी गटातून निवडून द्यावयाच्या संचालकांसाठी व्यापारी गटातील मतदार तर हमाल-मापाडी गटातील संचालक निवडण्यासाठी हमाल-मापाडी मतदार मतदान करतील.खर्चाचा भार असह्यसंपुर्ण तालुक्यातील शेतकरी अर्थात किमान दहा गुंठेधारक शेतकरी मतदान करणार असल्यामुळे एवढय़ा मोठय़ा मतदारांची यादी तयार करणे, तेवढी मतदान केंद्र तयार करणे, त्या पटीत मतदान कर्मचारी नेमणे, मतदान साहित्य उपलब्ध करून देणे आदींसाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च येणार आहे. निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी ही त्या त्या बाजार समितींची असते. जुन्या कायद्यानुसार जेवढा खर्च येत होता त्याचा दहा पट खर्च नवीन कायद्यानुसार होणा:या निवडणुकीसाठी येणार असल्यामुळे बाजार समित्या एवढा खर्च करतील का? तशी त्यांची आर्थिक स्थिती आहे का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत.काय आहे सध्याची स्थितीजिल्ह्यातील चारही बाजार समितींमध्ये सध्याची राजकीय स्थिती वेगवेगळी आहे. शहादा बाजार समिती सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथे काँग्रेस व भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.तळोदा बाजार समितीमध्ये सध्या सर्वपक्षीय संचालक मंडळ आहे. येथे गेल्या पंचवार्षीकला काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, माकप यांनी एकत्र येत बिनविरोध संचालक मंडळ निवडून आणले होते. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बदललेली असल्यामुळे आणि पालिका निवडणुकीतील राजकारण ढवळून निघालेले असल्यामुळे यंदाच्या पंचवार्षीकमध्ये येथे बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे येथेही काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष राहील. राष्ट्रवादी देखील मैदानात उतरेलच. माकप आपले पारंपारिक मतदान राखण्याची शक्यता आहे.धडगाव बाजार समिती सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. येथे देखील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी व भाजप अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.अक्कलकुवा बाजार समितीत काँग्रेसचे वर्चस्व आहे. पुढील येत्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप आणि शिवसेना अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. अर्थात येत्या काळात आणखी काय राजकीय समिकरणे रंगतील याकडेही लक्ष लागून आहे.
नंदुरबारातील बाजार समिती निवडणुकीत राजकीय समिकरणेही बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:42 PM