रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राजकारणात काही माणसे अशी असतात ज्यांच्या पदापेक्षा त्यांच्या शब्दाला महत्त्व असते. तर काही माणसे केवळ पद मिळवून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. मात्र नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या ओळखीसाठी कुठल्याही पदाची अथवा पक्षाची गरज नाही. तब्बल अडीच दशके राजकारणात आपला वैयक्तिक प्रभाव त्यांनी उमटवल्याने राज्यातील राजकारणात त्यांची वेगळी ओळख झाली आहे. पण असे असतानाही सध्या मात्र त्यांच्या नावाने प्रसिद्धीस दिलेल्या एका ‘लेटरहेड’ची चर्चा मात्र जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.चंद्रकांत रघुवंशी हे सलग तीनवेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. तत्पूर्वी दोनवेळा ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते. त्यांचा हा प्रवास काँग्रेस पक्षात झाला. मात्र वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे साहजिकच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्य शासनाने राज्यपालांकडे यादी दिली असून त्यात शिवसेनेतर्फे चंद्रकांत रघुवंशी यांचाही समावेश आहे. मात्र राज्यपालांनी अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. अर्थातच तांत्रिक बाबीमुळे नावे अधिकृतपणे जाहीर झाली नसली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आणि शब्दात रघुवंशी हे आमदार म्हणूनच चर्चेत येतात. परंतु ही चर्चा आणि त्यांच्या आमदारकीच्या नावावर दिलेले पत्र आता कायद्याच्या चौकटीत आणून त्यांच्या राजकीय विरोधकांनी प्रकरणाला नवा रंग दिला आहे.ग्रामपंचायत निवडणूक काळात बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे पत्र चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाने प्रसिद्धीस देण्यात आले. या पत्रावर ‘आमदार चंद्रकांत रघुवंशी’ असे नाव असून त्यावर राजमुद्राही आहे. वृत्तपत्रातून त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पत्रावर त्यांचे राजकीय विरोधक भाजपचे डॉ.रवींद्र चौधरी व सामाजिक कार्यकर्ते दिनकर पाटील यांनी आक्षेप घेत थेट राज्यपाल व निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आचारसंहितेच्या भंगाबरोबरच रघुवंशी हे आमदार नसताना राजमुद्रा असलेल्या व आमदार लिहीलेल्या पत्रावर हे वृत्त दिल्याने राजमुद्रेचा गैरवापराची तक्रार केली. ही तक्रार केल्यानंतर चंद्रकांत रघुवंशी यांनीही पोलिसांत फिर्याद देऊन आपल्या नावाने व आमदारकीच्या लेटरहेडवर कुणीतरी बोगस लेटरपॅडचा वापर करून निवेदन प्रसिद्ध केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासंदर्भात नंदुरबार शहर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी पुन्हा डिसेंबरमध्ये दिलेल्या अशाच काही इतर विषयासंदर्भातील पत्राचीही तक्रार केली आहे. या तक्रारींची चौकशी होऊन खरे-खोटे काय ते बाहेर येईलच. त्यामुळे हा विषय वेगळा असला तरी सध्या राजकीय गोटात ही चर्चा अधिक चर्चेची ठरली आहे. चंद्रकांत रघुवंशी हे सध्या जाहीर कार्यक्रमांमध्ये कुठे दिसून येत नाहीत. पालिकेच्या इमारतीचा ई-भूमिपूजन सोहळा व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा सोहळाव्यतिरिक्त ते इतर कार्यक्रमांना दिसून आले नाहीत. पण त्यांच्या या कथित पत्रामुळे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ‘रघुवंशीं’भोवती केंद्रीत होताना दिसून येत आहे.