लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूमुळे एकही वाहन रस्त्यावर उतरले नाही. सर्वच प्रमुख आणि गल्लीबोळातील रस्ते ओस पडले होते. शिवाय इतर सर्व कामकाज ठप्प असल्यामुळे वातावरणातील हवेच्या प्रदुषण पातळीत कमालीची घट दिसून आली. यामुळे हवेच्या प्रदुषणाची स्थिती सायंकाळपर्यंत निम्म्यावर आली होती. दरम्यान, नंदुरबारात प्रदुषण नियामक मंडळाचे कार्यालय नसल्यामुळे आकडेवारी मिळू शकली नाही.नंदुरबारसह जिल्ह्यात रविवारी जनता कर्फ्यू होता. यामुळे शहरात येणारी आणि शहराबाहेरून जाणारी सर्व वाहने बंद ठेवण्यात आली होती. एकहीजण घराबाहेर निघू शकला नाही. कुठलेही कामकाज झाले नाही. हॉटेल्स, चहा टपरी, नाश्ता लॉरी आदी सर्व बंद होते. वाहने बंद असल्यामुळे वाहनातून निघणारा कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण अवघ्या २० टक्यांवर आले होते. याशिवाय उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांच्या गॅस शेगडीमधून निघणारा वायू आदी सर्व बंद होते. त्याचाही परिणाम झाला. वाहने नसल्याने, लोकं रस्त्यावर नसल्याने आणि दुकाने बंद असल्यामुळे वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण देखील निम्म्यावर आले होते. त्याचा सर्व परिणाम हा हवेतील प्रदुषण कमी होण्यात आणि धुलीकण कमी होण्यात झाला.
एका दिवसात निम्म्यावर आली प्रदुषण पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:54 PM