लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील लोहारे ते तिधारे दरम्यान असलेल्या मोठ्या नाल्यावर लाखो रूपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र अवघ्या वर्षभरातच या पुलाचे तिनतेरा वाजले असून, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने नित्कृष्ट दर्जाचे काम करून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे या प्रकारामुळे उघड झाले आहे. या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सरपंच मिराबाई ठाकरे, तिधारे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.दरम्यान पुल तुटल्याने तिधारे व पुढे डामळदा-खेतियाकडे जाणारा हा रस्ताच बंद पडल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून, नागरिकांना नाल्यातून पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे परिसरात प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.याबाबत असे की, शहादा तालुक्यातील लोहारा, तिधारे, कलमाडी, गोगापूर, डामळदा, टुकी व जवखेडा या भागाकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष असते. या भागतील रस्त्यांवर दरवर्षी लाखो रूपये खर्च केला जातो. मात्र भ्रष्ट यंत्रणेमुळे रस्त्याची अवस्था दयनीय होवून जाते. खड्ड्यांच्या रस्त्यामुळे तिधारे ते डामळदा, खेतिया रस्त्यावर तिधारे-लोहारा दरम्यान मोठ्या नाल्यांवर गेल्या वर्षी लाखो रूपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले.या पुलाचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे. तर लोहारे ते तिधारे रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये मंजूर असल्याचे सांगितले जात आहे. या मार्गावरील रस्त्याचे कामदेखील अर्धवट अवस्थेत आहे. नाल्यावरील पुलाचे बांधकाम तांत्रिक दृष्ट्या अत्यंत सदोष पद्धतीने करण्यात आल्यामुळे पुलाचे काही महिन्यातच १२ वाजले. पुलाच्या दोन्ही बाजुकडील भराव वाहून गेल्याने मोठ-मोठे खड्डे तयार झाले आहेत. पुलाचे कठडे तुटल्याने रस्ता पूर्णपणे खंडित झाला आहे. उन्हाळ्यात नाला कोरडा असल्याने दुचाकी वाहनधारक नाल्यातून प्रवास करतात. चारचाकी वाहनासह नाल्यातून प्रवास करतात. चारचाकी वाहनासह बैलगाडी घेवून जाणे अवघड असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.याबाबत निकृष्ट दर्जाने झालेल्या पुलाच्या कामाची नाशिक येथील गुण व नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच मिराबाई ठाकरे, परिसरातील नागरिक यांनी केली असून, याबाबत मुख्यमंत्र्यासह वरिष्ठांना कामाच्या छायाचित्रासह निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती जागृत ग्रामस्थांनी दिली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या लोहारा-तिधारे रस्त्याचे व पुलाच्या कामाचे पूर्णपणे तिनतेरा वाजले आहेत. अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने सर्व कामे हलक्या व कमी प्रतिचे मटेरियल वापरल्याने निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. पंतप्रधान सडक योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही अधिकारी व ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराचे कुरणच शासनाने उपलब्ध करून दिले आहे. या योजनेनुसार करोडो रूपये खर्चून ग्रामीण भागातील रस्ते, पूल व पाईप मोºया करण्यात येत आहेत. मात्र ही कामे अंदाज पत्रकानुसार व तंत्रशुद्धरित्या काटेकोरपणे होत नसल्याने काही महिन्यातच रस्त्याचे व पुलांची दुर्दशा व्हायला लागते. हे तिधारे नाल्यावरील पुलाची अवस्था प्रत्यक्ष बघितल्यावर कळेल, अशी प्रतिक्रिया वाहनधारक व्यक्त करीत आहेत. अधिकारी व ठेकेदारांनाही वरिष्ठांचे आशिर्वाद असल्यानेच अधिकाऱ्यांचे फावले आहे. तिधारे गावाला जोडणारे सर्व चारही रस्ते तुटल्याने रस्त्यावरील वाहतूक असतांना लोकप्रतिनिधीसह जबाबदार अधिकारीही येथील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोहारे ते तिधारेजवळील पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:28 PM