लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सप्तशृंगी माता मंदिराशेजारील तळोदा व दोंडाईचाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लहान-मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मंदिराला लागून असलेल्या अतिक्रमणामुळे दोन्ही बाजूकडून येणाºया पादचारी व वाहनधारकांमध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चौकातून जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.शहादा-दोंडाईचा व शहादा-तळोदा रस्ता असलेली चौफुली भगवा चौक म्हणून प्रसिद्ध आहे. धुळे, नंदुरबार, तळोदा व शिरपूरकडे जाण्यासाठी प्रवासी या चौकात थांबतात. शहादा शहरातील सरस्वती कॉलनी, साईबाबा नगर, दोंडाईचा व तळोदा-नंदुरबारकडे जाणाºया लहान-मोठ्या वाहनांची याठिकाणी नेहमी वर्दळ असते. चौकीजवळच सप्तशृंगी माता मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. या चौफुलीवर प्रवासी वाहनाच्या प्रतीक्षेत थांबलेले असतात. याठिकाणीच बसथांबाही असल्याने प्रवाशांची गर्दी असते. या चौफुलीवर खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया जीप व रिक्षाही प्रवाशांना नेण्यासाठी थांबतात. मात्र अतिक्रमणामुळे वाहनांना निघण्यासाठी काहीवेळा अडचण येते. अशातच भरधाव वेगाने वाहन आल्यास अपघातसदृश्य परिस्थिती निर्माण होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहनांची गर्दी राहत असल्याने वाहन काढणेही कठीण होते. वाहन काढण्यावरुन काहीवेळा वादही निर्माण होतात. याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
शहादा बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पुतळ्याजवळच रिक्षा स्टॉप असून पुढे १०० मीटर अंतरावर प्रवासी वाहतूक करणारी शेकडो वाहने नेहमी उभी असतात. या वाहनांमुळे वाहतुकीची नेहमी कोंडी होते. वाहतुकीचा प्रश्न उद्भवल्यास अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक अरेरावीची भाषा वापरतात. या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीचे नियोजन करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.