हंसराज महालेलोकमत न्युज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील ग्रामपंचातींचा पदभार एका ग्रामसेवकाकडे तर दप्तर दुसऱ्याच ग्रामसेवकाकडे असल्याचे प्रकार सामोरे आहे. नवनियुक्त ग्रामसेवकाकडे चार्ज दिल्यानंतर तब्बल पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील पूर्वीचे ग्रामसेवक संपूर्ण दप्तर सोपवायला का तयार नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तळोदा पंचायती समिती अंतर्गत ग्रामसेवकाच्या पदभार असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये बदल करण्यात आला होता. त्यातच बाहेरील जिल्ह्यातून बदल्या होऊनदेखील काही ग्रामसेवक फेब्रुवारी, मार्च महिन्यात तळोदा पंचायत समितीत रुजू झाले होते.ग्रामसेवकाच्या रिक्त पदांमुळे काही ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा पदभार होता. परंतु बाहेरील जिल्ह्यातील ग्रामसेवक तळोदा पंचायत समितीत रुजू झाले असताना अतिरिक्त पदभार असणाऱ्या ग्रामसेवकाकडून पदभार त्यांच्याकडे देणे अपेक्षित असताना त्यांना अनेक दिवस कोणत्याही ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते. दरम्यान,नंतरच्या कालावधीत तळोदा पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवकांच्या ग्रामपंचायतींची अदलाबदल करण्यात आली. नवीन ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकांना पूर्वीचा पदभार असणाऱ्या ग्रामसेवकानी त्यांना चार्ज दिला, पण दप्तर मात्र दिले नसल्याचा प्रकार समोरे आला.तळोदा तालुक्यातील सिलिंगपूर ग्रामपंचायतीबाबत हा प्रकार घडला आहे. पूर्वीच्या ग्रामसेवकाने नव्याने पदभार सोपविण्यात आलेल्या ग्रामसेवकाकडे चार्ज दिला खरा सध्या ग्रामपंचायतीचे दप्तर सोपविताना ते अपूर्ण सोपविले. त्यामुळे सध्या पदभार असणाऱ्या ग्रामसेवकाकडून गेल्या वर्षभरात गावात ग्रामविकासाच्या योजनांची व अन्य बाबींची माहिती विचारणाऱ्या नागरिकांना संबंधित पदभार असणारा ग्रामसेवक माहिती देता येत नसल्याची स्थिती आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागणाऱ्यांनादेखील विहित मुदतीत ग्रामसेवक माहिती उपलब्ध करून द्यायला असमर्थ ठरले असून, प्रथम अपीलच्या सुनावणी दरम्यान संबंधित ग्रामसेवकाने त्याची अडचण प्रथम अपिलीय अधिकाऱ्यापुढे बोलून दाखविली. या सर्व प्रकारांमुळे पूर्वीचे ग्रामसेवकाने सुमारे सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण अद्याप संपूर्ण दप्तर का सोपविले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. असा प्रकार इतर ग्रामपंचायतीच्या बाबतीतदेखील असण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करण्याची गरज आहे. दरम्यान, तळोदा पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवकांना देण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पदभाराबाबत मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क लावले जात असून, ग्रामपंचायती विशिष्ट ग्रामसेवकांना जाणीवपूर्वक मलाईदार व जास्तीच्या ग्रामपंचायतीचा पदभार देण्यात येत असल्याचीदेखील जोरदार चर्चा आहेत. या प्रकाराकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
सुनावणी दरम्यान विद्यमान जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत सिलिंगपूर यांनी समक्ष कथन केले की, तत्कालीन ग्रामसेवक यांनी परिपूर्ण दप्तर मला चार्ज यादीसह दिले नाही. त्यानुसार मला सदरची माहिती संबंधितांना उपलब्ध करून देता आली नाही. तत्कालीन ग्रामसेवक यांना परिपूर्ण दप्तर विद्यमान ग्रामसेवक यांना तात्काळ तीन दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - आर के जाधव, विस्तार अधिकारी, (ग्रामपंचायत)पंचायत समिती, तळोदा